युग चांडक हत्याप्रकरणात दोषारोपपत्र
By admin | Published: November 29, 2014 02:45 AM2014-11-29T02:45:07+5:302014-11-29T02:45:07+5:30
राज्यभर गाजलेल्या युग चांडक हत्याप्रकरणात लकडगंजचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी सत्यनारायण जयस्वाल यांनी ...
नागपूर : राज्यभर गाजलेल्या युग चांडक हत्याप्रकरणात लकडगंजचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी सत्यनारायण जयस्वाल यांनी शुक्रवारी जेएमएफसी न्यायालयात दोन आरोपींविरुद्ध १५० वर पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
आरोपींवर भादंविच्या कलम ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे), ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण), १२०-ब (कट रचणे), ३४ असे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. हे प्रकरण कायद्यानुसार सत्र न्यायालयाकडे वर्ग केले जाईल.
राजेश धनालाल दवारे (१९) व अरविंद अभिलाष सिंग (२३) अशी आरोपींची नावे असून राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट, तर अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. १ सप्टेंबर रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेच्या वेदना आजही ताज्या आहेत. आरोपी राजेश महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील ‘डेंटल क्लिनिक’ मध्ये अटेडंन्ट कम क्लर्क म्हणून ‘पार्ट टाईम जॉब’ करीत होता. तो क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांकडून आगाऊ पैसे वसूल करायचा. संगणकातील पैशाबाबतच्या अनेक नोंदी त्याने गहाळ केल्या होत्या. संगणकावर खेळत असताना युगला ही बाब समजली होती. तेव्हापासूनच राजेश युगचा द्वेष करीत होता. त्याने दोन-तीन वेळा युगला थापडा मारल्या होत्या. युग एकदा रडत असताना डॉ. चांडक यांनी राजेशला फटकारले होते. परंतु, राजेशच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही. यामुळे डॉ. चांडक यांनी त्याला ८ आॅगस्ट २०१४ रोजी कामावरून काढून टाकले. यासाठी युगला जबाबदार धरून त्याने मित्र अरविंदसोबत सूड घेण्याची योजना आखली होती.
आरोपींची क्रूरता
नागपूर : राजेशने युगची शाळेत येण्या-जाण्याची माहिती काढली होती. १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास तो युगच्या घरासमोर थांबला. आपण आजही कामावर आहोत, हे भासवण्यासाठी त्याने क्लिनिकचा लाल रंगाचा टी शर्ट घातला होता. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास युग बसमधून खाली उतरताच राजेशने त्याला गाठले आणि ‘पप्पाने जल्दी क्लिनिक में बुलाया है’, असे सांगितले. दप्तर चौकीदाराला देऊन युग लगेच राजेशच्या स्कूटीवर बसला. थोडे समोर अरविंद उभा होता. यानंतर तिघेही कळमन्याकडील रस्त्याने निघाले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच युगने राजेशला हटकले. तो स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडत होता. त्याचवेळी राजेशने युगला क्लोरोफॉर्मची सुंगणी दिली. दोन्ही नराधमांनी युगला पाटणसावंगी ते लोनखैरीदरम्यानच्या निर्जन अशा नाल्याच्या पुलाखाली नेले. त्यावेळी सायंकाळचे ६ वाजले होते.
राजेशने युगला आधी थापडा मारल्या. त्यानंतर एकाने पाय पकडून दुसऱ्याने त्याचा गळा दाबला. जमिनीत खड्डा करून त्यात युगचे मुंडके बुजविले व वरून चौकोनी दगड ठेवला. यामुळे युगचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)