पिसाळलेला श्वान, प्राणी प्रेमी अन् महापालिका अधिकाऱ्यांची अनास्था
By नरेश डोंगरे | Published: May 14, 2024 10:17 PM2024-05-14T22:17:50+5:302024-05-14T22:18:25+5:30
स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतीसाठी याचना : २४ तास होऊनही महापालिकेकडून मदत नाही
नागपूर: पिसाळलेला एक श्वान परिसरातील कुणाच्याही अंगावर धावून चावा घेण्याचा प्रयत्न करतो. ते माहिती पडताच श्वानप्रेमी तरुण, तरुणी त्याला कसे बसे पकडून खासगी डॉक्टरकडे नेतात. श्वान त्या दोघांनाही चावा घेतो. परंतू निरपराध नागरिकांना धोका होऊ नये म्हणून हे दोघे स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याच्यावर उपचार करून घेतात. त्यानंतर ते महापालिकेच्या हेल्पलाईनवर आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार मदतीची याचना करतात. मात्र, संबंधित अधिकारी २४ तास होऊनही मदत करीत नाहीत.
विशेष म्हणजे, मोकाट श्वानाचा मुद्दा अलिकडेच न्यायालयात चर्चेला आला असून, त्यासंबंधाने महापालिकेला आदेशही मिळाले आहेत. अशात आता उपराजधानीतील श्वानच नव्हे तर नागरिकांच्या बाबतीतही संबंधित अधिकाऱ्यांची कशी अनास्था आहे, ते स्पष्ट करणारा हा संतापजनक प्रकार आज उजेडात आला आहे.
पारडीतील सुंदरनगर परिसरात सोमवारी सायंकाळपासून एक मोकाट श्वान अचानक आक्रमक झाला. तो कुणाच्याही अंगावर धावून चावा घेण्याचा प्रयत्न करू लागला. एका श्वानप्रेमी युवतीला हा प्रकार दिसताच तिने भूतदयेची भावना ठेवणाऱ्या एका तरुणाच्या मदतीने त्या श्वानाला कसे बसे आवरले. त्याला उपचारासाठी श्वानाच्या खासगी डॉक्टरकडे नेले. दरम्यान, महापालिकेच्या संबंधित विभागात, हेल्पलाईनवर फोन करून या श्वानाची माहिती देऊन त्याला शेल्टरमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.
ईकडे उपचाराला नेताना त्या युवतीला तसेच तरुणाला तो श्वान चावला. मात्र, प्राणीप्रेमापोटी त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या श्वानावर उपचार करून घेतले. श्वानाला रेबिस असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली. त्यामुळे हे दोघेही घाबरले मात्र त्यांचे प्राणी प्रेम 'जैसे-थे'च होते. त्यांनी माहापलिकेची गाडी येईपर्यंत दुसऱ्या कुणाला या श्वानाने चावू नये म्हणून आपल्या घरात नेले. त्यानंतर वारंवार हेल्पलाईन तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे फोन करून मदत मागितली. मात्र, प्रत्येकानेच हो, येतो, पाठवतो, असे सांगून त्यांची बोळवण केली.
२४ तास उलटूनही मदत नाही
२४ तास होऊनही महापालिकेकडून मदत मिळालीच नाही. अशा अवस्थेत हा श्वान मोकाट सोडला तर तो कुणालाही चावत सुटेल, त्याचे भयंकर परिणाम समोर येतील, याची कल्पना असल्याने अखेर या तरुण-तरुणीने स्पिचलेसच्या स्मिता मिरे यांची मदत मिळवून एका खासगी 'डॉग कॅचर'ला बोलविले. त्याला १२०० रुपये देऊन त्या श्वानाला भांडेवाडीच्या शेल्टरमध्ये नेऊन सोडण्यात आले.
१० गाड्या आणि पुरेसे मणूष्यबळ, मात्र...
या प्रकारामुळे श्वान प्राणी प्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कामासाठी महापालिकेकडे झोनसाठी १० गाड्या आणि पुरेसे मणूष्यबळ देण्यात आले आहे. मात्र, पिसाळलेल्या श्वानाला तातडीने शेल्टरमध्ये नेण्याची आणि त्याच्यापासून नागरिकांना होऊ पाहणारा जिवघेणा धोका टाळण्यासाठी वारंवार मागणी करूनही तब्बल २४ तास मदत मिळत नसेल तर याला काय म्हणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सहृदय तरुण-तरुणीने तो श्वानाला घरी न ठेवता मोकाट सोडून दिले असते तर किती मोठा अनर्थ घडला असता, याची कल्पना केलेलीच बरी. दरम्यान, या संबंधाने दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी लोकमतने संबंधित अधिकाऱ्याच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.