'त्या' आमदाराला बरखास्त करा; आदित्य ठाकरेंची मागणी
By मंगेश व्यवहारे | Updated: December 19, 2024 15:38 IST2024-12-19T11:34:00+5:302024-12-19T15:38:06+5:30
Nagpur : मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा म्हणणाऱ्या आमदाराला बरखास्त करण्याची मागणी

Dismiss that MLA; Aditya Thackeray's demand
मंगेश व्यवहारे
नागपूर : मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला बरखास्त करा, अशी मागणी शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
दोन दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तर कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,‘काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केला असल्यास ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला हवे. मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसाने भरपूर संघर्ष केला आहे, तो विसरता येणार नाही.’ बेळगाव प्रश्नावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,‘बेळगाव व मुंबई याची तुलना करणे चुकीचे आहे. मुंबईने कधीच बेळगावप्रमाणे कुठल्याच भाषिकावर अन्याय केला नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे व राहणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.’