ललित पाटील प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास ससूनच्या अधिष्ठात्यांची बडतर्फी
By योगेश पांडे | Published: December 12, 2023 04:48 PM2023-12-12T16:48:24+5:302023-12-12T16:48:36+5:30
फडणवीस यांनी २०२१ मध्ये ललित पाटीलच्या कस्टडीबाबतच्या पत्राकडे तत्कालिन सरकारने दुर्लक्ष का केले असा सवालदेखील उपस्थित केला.
नागपूर : पुण्यातील ससूनन रुग्णालयात उपचार घेत असताना ललित पाटील या कैद्याकडून चालविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. या प्रकरणात जर ससूनच्या अधिष्ठात्यांविरोधात पुरावे मिळून आरोप सिद्ध झाल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येईल. तसेच कितीही मोठा पोलीस अधिकारी यात गुंतलेला आढळला तरी त्याच्यावर लगेच कारवाई होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, फडणवीस यांनी २०२१ मध्ये ललित पाटीलच्या कस्टडीबाबतच्या पत्राकडे तत्कालिन सरकारने दुर्लक्ष का केले असा सवालदेखील उपस्थित केला.
महादेव जानकर, शशिकांत शिंदे, अनिल परब इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला होता. ललित पाटील प्रकरणाचा तपास सुरू असून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या तस्करीत थेट सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागलेले नाही. मात्र कैद्याच्या संरक्षणासाठी नेमलेल्या दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले तर सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे.ललित पाटीलला कागदोपत्री भरपूर आजार होते. मात्र तरीदेखील तो पळून गेला ही आश्चर्याची बाब आहे, असे फडणवीस म्हणाले.
तत्कालिन सरकारने परवानगी नाकारली
ललित पाटीलला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती व त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याची पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याने त्याबाबत उच्च न्यायालयात अपिल करण्याबाबत तत्कालिन पोलीस आयुक्तांनी राज्य शासनाला पत्र लिहीले होते. मात्र अपिल करण्याची परवानगीच मिळाली नाही. ललित पाटीलची एकही दिवस चौकशी होऊ शकली नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.