नागपुरातील रंगेल पोलिसांवर बरखास्तीचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:06 PM2019-09-06T12:06:30+5:302019-09-06T12:13:02+5:30
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला शरीरसुखासाठी पाचारण करणाऱ्या रंगेल पोलिसांना एसीबीने सापळा रचून पकडले.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरीरसुखासाठी तरुणी मिळाव्या म्हणून दोषी रंगेल पोलिसांनी त्यांच्या म्होरक्याच्या आदेशावरून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला सुटीच्या दिवशी गुन्हे शाखेत बोलवून तब्बल तीन तास बसवून ठेवले. या प्रकरणातील धक्कादायक घटनाक्रम उजेडात आल्यामुळे सर्वत्र संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रंगेल पोलिसांना बरखास्त करण्याची तयारी चालविली आहे. तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेऊन दोषी पोलिसांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचा आणि बरखास्तीच्या काळातील वेतन तसेच अन्य लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा राहू नये म्हणून वरिष्ठ पातळीवर विचारमंथन सुरू आहे.
एएसआय दामोदर राजूरकर (वय ५६) आणि हवालदार शितलाप्रसाद रामलखन मिश्रा (वय ५१) तसेच त्यांच्या एका म्होरक्याने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला एमपीडीएची कारवाई करून वर्षभरासाठी कारागृहात डांबण्याची धमकी देऊन २५ हजार रुपये तसेच शरीरसुखासाठी तीन वारांगनांची मागणी केली होती. विशेष म्हणजे, महिलेने त्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी दाखवताच ३० आॅगस्टला रविवारी कार्यालय बंद असूनही आरोपींनी या महिलेला गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवून घेतले आणि तेथे म्होरक्याच्या सांगण्यानुसार तिला तीन तास बसवून ठेवले. या तीन तासात आरोपी त्यांच्या म्होरक्यांच्या संपर्कात होते.
एसीबीने लावलेल्या सापळ्यानुसार महिलाही म्होरक्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, धूर्त म्होरक्याला शंका आल्यामुळे तो तिच्यासोबत थेट बोलण्याचे टाळत होता. म्होरक्याने महिलेशी बोलणी केली मात्र मोबाईल दुसराच होता. कॉल डिटेल्सवरून हे सर्व एसीबीच्या रेकॉर्डवर आले आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे म्होरक्याला अटक करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्याचमुळे म्होरक्याला अटक करण्यासाठी कायदेशीर पैलूंचा अभ्यास केला जात आहे. परंतू, लाचेची रक्कम आणि वारांगनांची मागणी करणाऱ्या राजूरकर आणि मिश्राच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने एसीबीने त्यांच्या मुसक्या बांधल्या. दरम्यान, या संतापजनक प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर पोलीस दलात भूकंप आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून,
पोलीस दलाची प्रतिमा मलिन करू पाहणाऱ्या राजूरकर, मिश्राला निलंबित करून थांबायचे नाही तर कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांना सेवेतूनच बरखास्त (डिसमिस) करा, असे आदेश त्यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेचे (बंदोबस्ताचे) दडपण सध्या शहर पोलीस दलावर आहे. त्यामुळे सर्वच पोलीस अधिकारी-कर्मचारी त्यात गुंतले आहेत. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाला विलंब होत आहे.
डिफॉल्टरांची यादी बनवा
काहींचा ‘अपवाद वगळता’ बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबद्दल तीव्र नाराजी नव्हे संताप व्यक्त केला आहे. यापुढे कुणीही पोलीस दलाच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविण्याची हिंमत दाखवू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलात असलेल्या अशा डिफॉल्टरची यादी तयार करण्याचे आदेश दिल्याचेही सूत्रांचे सांगने आहे. यात जुगार, दारू, मटका आणि रेती, मातीत कोळशाच्या तस्करीत पैसे खाणाऱ्या डिफॉल्टरचाही समावेश करण्याचे सांगण्यात आल्याचे समजते.