कर्तव्यात हलगर्जीपणा वाडीचे ठाणेदार निलंबित
By admin | Published: February 10, 2017 02:35 AM2017-02-10T02:35:05+5:302017-02-10T02:35:05+5:30
मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) भीमराव खंदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
शहर पोलीस हादरले : अधिकाऱ्यांमधील प्रतिस्पर्धाही कारणीभूत असल्याची शंका
नागपूर : मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) भीमराव खंदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. शांतिनगर येथील जुगार प्रकरणादरम्यान ही कारवाई करण्यात आल्याने शहर पोलीस हादरले आहे.
मुलीवरील अत्याचाराची घटना अडीच महिने जुनी आहे. दहावीची एक विद्यार्थिनी आपल्या वर्ग मित्रासह शिकवणी वर्गावरून घरी परत येत होती. नवनीतनगरजवळ एका निर्जन स्थळी तीन आरोपींनी दोघांना अडविले. मारहाण करून विद्यार्थिनीच्या वर्ग मित्राला हाकलून दिले. यानंतर पीडित विद्यार्थिनीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही न सांगण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाले. विद्यार्थिनीने आपल्या आईला घडलेली घटना सांगितली. तिचे वडील वाहनचालक आहेत. ते घरी परतल्यानंतर १५ दिवसांनी ते वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. पीडित मुलीच्या कुटुंबीयानुसार बदनामी होण्याचा हवाला देत अत्याचाराऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.
पोलिसांनी विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलिसांच्या भूमिकेमुळे संतापलेल्या पीडित कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेची तक्रार केली. झोन तीनच्या डीसीपी दीपाली मासिरकर यांनी पीडित विद्यार्थिनीच्या आई-वडिलांशी विचारपूस केली. यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.