दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धचा अर्ज खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:07 AM2021-05-11T04:07:58+5:302021-05-11T04:07:58+5:30
नागपूर : कामठीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ललित वर्टीकर व पोलीस उपनिरीक्षक ए़.एस़. टोपले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १६६ व २१८ ...
नागपूर : कामठीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ललित वर्टीकर व पोलीस उपनिरीक्षक ए़.एस़. टोपले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १६६ व २१८ आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १३(१)(२) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात यावा, अशा विनंतीसह भीलगाव येथील सुशील यादव यांनी दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने गुणवत्ताहीन ठरवून खारीज केला. न्या़.व्ही़.बी़. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.
सुशील यादव यांनी राजेंद्र यादव यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यासाठी २ सप्टेंबर, २०१७ रोजी कामठी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्यासोबत आवश्यक पुरावेही दिले होते़ असे असताना, वर्टीकर यांनी राजेंद्र यादव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला नाही, त्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून वर्टीकर यांनी राजेंद्र यादव यांना वाचवण्यासाठी आर्थिक लाभ मिळविला असल्याचे सिद्ध होते. या गैरप्रकारात टोपले यांचाही समावेश आहे, असा आरोप सुशील यादव यांनी केला होता. या संदर्भात गृहविभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडेही लेखी तक्रारी केल्या, पण त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली नाही, असेही अर्जात नमूद करण्यात आले होते.