नागपुरात आधार लिंकिंगच्या कामात सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 10:19 PM2020-07-07T22:19:04+5:302020-07-07T22:20:25+5:30
नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. नवीन रेशन कार्डधारकांना अन्न पुरवठा विभागाच्या झोन कार्यालयात दररोज हेलपाटे घालावे लागत असून, तासन्तास रांगेत उभे राहूनही त्यांचे काम होत नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही हे हाल सहन करावे लागत आहे. या अवस्थेमुळे राज्य शासनाच्या अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण पोर्टलवर संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे.
पोर्टलवर तक्रार नोंदविणारे एक रेशन कार्डधारक सचिन खोब्रागडे यांनी विभागाद्वारे बेजबाबदार कारभार सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले, रेशन कार्डच्या आधार लिंकिं गच्या प्रक्रियेसाठी मर्यादित कालावधी व दिवसाचे प्रावधान असल्याची कुठलीही अधिसूचना शासनाने काढली नाही. असे असताना नागपूरच्या अन्न पुरवठा विभागात आधार लिंक प्रक्रियेचे काम केवळ सोमवार ते गुरुवारपर्यंत करण्यात येत आहे. शिवाय सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे, जेव्हा की नियमानुसार ऑनलाईन प्रक्रिया सायंकाळपर्यंत करता येणे शक्य आहे.
लोकांच्या रांगा लागलेल्या असताना केवळ एका खिडकीतून काम केले जात आहे. विभागाच्या या मनमानीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रेशन कार्ड बनविल्याच्या तीन महिन्यानंतर आधार लिंकिंगचे काम सुरू करण्यात आले असून, यावरूनही विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. शासनाच्या नियमाविरोधात विभाग काम करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. उत्तर विभागाच्या झोन कार्यालयात येणाऱ्या समस्यांचा उल्लेख करीत, सर्व झोन कार्यालयात अशीच अव्यवस्था असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे आधार लिंक झाले नसल्याने नवीन रेशन कार्डधारकांना धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन डेटा उपलब्ध झाल्यानंतरच त्यांना धान्य पुरवठा होणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकमतने प्रकाशात आणली परिस्थिती
विशेष म्हणजे लोकमतने नुकतीच शहरातील २३४८ नवीन रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित असल्याचे वृत्त प्रकाशित करून विभागाच्या कारभाराची पोलखोल केली होती. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभागारामुळे आधार लिंकिंगची प्रक्रिया अपूर्ण राहिली असून, नवीन कार्डधारकांना धान्य मिळेनासे झाले आहे. यामुळे गरीब कुटुंबांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.