मुद्रणकलेचे सौंदर्य प्रदर्शित करणारे प्रदर्शन
By admin | Published: May 9, 2015 02:26 AM2015-05-09T02:26:48+5:302015-05-09T02:26:48+5:30
हल्ली नवनवे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर मुद्रणाच्या पद्धतीत अनेक बदल झाले.
नागपूर : हल्ली नवनवे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर मुद्रणाच्या पद्धतीत अनेक बदल झाले. पण पूर्वी मात्र प्रिंट मेकिंग ग्राफिक्सच्या माध्यमातूनच विविध प्रदेशांच्या मुद्रा तयार करण्यात येत होता. मुळातच ही प्राचीन कला तंत्रज्ञानाच्या प्रवाहात काहीशी हरविली. निगेटिव्ह प्रिंट तयार झाल्यावर त्याची इमेज मात्र पॉझिटिव्ह येते आणि त्याच्या कितीही प्रती काढता येतात, हे या कलेचे वैशिष्ट्य आहे. या कलेला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी आणि या कलेचा उपयोग करून घेण्यासाठी छापखाना हा उपक्रम राबविण्यात आला. यात तब्बल बारा चित्रकारांच्या परिश्रमातून अनेक कलाकृती तयार झाल्या आहेत. या कलाकृतींचे प्रदर्शन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले असून आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार डी. के. मनोहर यांच्या हस्ते उद्घाटित हे प्रदर्शन ११ मे पर्यंत रसिकांसाठी सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रो. दत्तात्रय कांडगे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रंचित पोरेड्डीवार उपस्थित होते. मिलिंद लिंबेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यात वेगवेगळ्या संस्थांमध्ये कलाशिक्षक असणारे कलावंत एकत्रित आले आणि हा उपक्रम यशस्वी झाला. कोरेक्स आणि सिल्क प्रिन्टींग या दोन माध्यमातून या प्रदर्शनात काम करण्यात आले आहे.
प्रामुख्याने यात वेगवेगळ्या इंक उपयोगात आणून भन्नाट डिझाईन्स काढण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यात आला. याप्रसंगी डी. के. मनोहर म्हणाले, प्रिंट माध्यमाचा हा अनुभव अतिशय वेगळा आहे. शिवराज लिथो वर्क्समध्ये अनेक जुने प्रिंट आहेत.
त्यात राजा रविवर्मा, पं. हळदणकर आदींच्या कलाकृती आहेत. तेथे जाऊन कलावंतांनी या प्रिंटचाही अभ्यास करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पोरेड्डीवार यांनी ही अत्यंत प्राचीन कला असल्याचे सांगून यानिमित्ताने ही कला लोकापर्यंत पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त केले. यात ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, मिलिंद लिंबेकर, सदानंद चौधरी, शशिकांत रेवडे, अंजली बावसे, वीरेन्द्र चोपडे, आनंद डबली, विनोद चाचेरे, मौक्तिक काटे, चंद्रशेखर तांडेकर, मंगेश कापसे आणि अभिषेक चौरसिया यांच्या कलाकृतींचा सहभाग आहे. या प्रदर्शनाला सर्व रसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
प्राचीन कलेची लोकप्रियता यातून वाढेल
ही प्राचीन मुद्रणकला आहे. पूर्वी याच पद्धतीने विविध प्रदेशांच्या वेगवेगळ्या मुद्रा तयार करण्यात येत होत्या. पण या माध्यमातून तयार होणाऱ्या कलाकृतींचे महत्त्व वेगळे आहे. विशेषत: या कलेच्या माध्यमातून अनेक प्रिंट तयार करता येतात आणि अधिकाधिक रसिकांपर्यंत या कलाकृतींना पोहोचविता येऊ शकते. सर्वच कलावंतांनी या उपक्रमात दाखविलेली प्रतिभा प्रशंसनीय आहे.
-खा. विजय दर्डा,
चेअरमन, लोकमत मिडिया प्रायव्हेट लिमिटेड.