नागपूर जिल्ह्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:52 AM2018-01-19T10:52:08+5:302018-01-19T10:53:18+5:30
देवलापार पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या १० बैलांची सोडवणूक करीत ती देवलापार येथील गोरक्षण केंद्रात पाठविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
देवलापारचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्यासह पोलीस कर्मचारी हे रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायालयात गेले होते. तेथून हिवराबाजारमार्गे परत येत असताना त्यांना झिल्लू तलावाजवळ १० बैलांना एकमेकांना दोराने बांधून पायी घेऊन जाताना दोन व्यक्ती दिसले. बैलांच्या तोंडातून खूप फेस येत होता तसेच काठी आणि दोराने बैलाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा आणि वळ दिसून आले. याबाबत पोलिसांनी आरोपींना विचारताच त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच बैल खरेदीच्या कागदपत्राबाबत विचारणा केल्यावरही त्यांच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे पंचासमक्ष त्या दोघांची चौकशी केली. चौकशीत मध्य प्रदेशातील गावांतून हे १० बैल त्यांनी आणल्याची कबुली देत कामठी येथे कत्तलीसाठी पायदळ घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. फारुख याकूब शेख (३३, रा. हिवराबाजार), रामेश्वर रोशन पिलगेरे (२८, रा. घोटी रमजान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी देवलापार पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या १० बैलांची सोडवणूक करीत ती देवलापार येथील गोरक्षण केंद्रात पाठविली. आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियमच्या सहकलम ५ (अ), ९, महाराष्ट प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
ही कारवाई ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या नेतृत्वात चालक पोलीस हवालदार विलास गायकवाड, पोलीस नायक राजू राठोड, संदीप कडू, शिपाई कुलदीप आहाके, योगेश कुहिटे यांनी पार पाडली. पुढील तपास ठाणेदार मट्टामी करीत आहे.