पावसाची हुलकावणी, पिके धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:41+5:302021-07-07T04:10:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : मृग नक्षत्रात काेसळलेल्या पावसामुळे रेवराल (ता. माैदा) परिसरातील शेतकऱ्यांना धानाची राेवणी वगळता अन्य पिकांची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : मृग नक्षत्रात काेसळलेल्या पावसामुळे रेवराल (ता. माैदा) परिसरातील शेतकऱ्यांना धानाची राेवणी वगळता अन्य पिकांची पेरणी केली. धान उत्पादकांनी पऱ्हेही टाकले. सुरुवातीच्या काळात अधूनमधून पावसाच्या सरी काेसळल्याने पिकांची स्थिती समाधानकारक हाेती. मात्र, मध्यंतरी पावसाने हुलकावणी दिल्याने ही पिके धाेक्यात आली आहेत. त्यातच काही शिवारात वन्यप्राण्यांनी काेवळ्या पिकांवर डल्ला मारायला सुरुवात केल्याने आधीच चिंतित असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची वेळ आली आहे.
चालू खरीप हंगामात माेसमी वाऱ्याचा पाऊस वेळेवर व मुबलक काेसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला हाेता. त्यातच राेहिणी नक्षत्राच्या शेवटी व मृगाच्या सुरुवातीला पाऊस काेसळल्याने शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवत कपाशी, तूर व अन्य पिकांची पेरणी केली. त्यातच अनेकांनी धानाचे पऱ्हेही टाकले तर काहींनी मिरचीची लागवड केली. पीक जमिनीतून वर आल्यावर मात्र पावसाने हुलकावणी द्यायला सुरुवात केली.
आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके काेमेजायला सुरुवात झाली आहे. तालुक्यात ओलिताचे प्रभावी साधन नसल्याने तसेच पेंच प्रकल्पाच्या कालव्यात पाणी साेडले जात नसल्याने शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी आकाशाकडे बघण्यावाचून गत्यंतर नाही. दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाणे, खते व अन्य निविष्ठांची खरेदी करण्यासाठी पैसा आणायचा कुठून? असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. ही परिस्थती संपूर्ण माैदा तालुकाभर बघायला मिळते.
...
काेवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा डल्ला
रेवराल परिसरात वन्यप्राण्यांचाही वावर आहे. काही शेतातील पिके थाेडीफार सुस्थितीत असून, त्यावर वन्यप्राण्यांची डल्ला मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी डाेकेदुखी सहन करावी लागत आहे. वनविभाग वारंवार मागणी करून वन्यप्राण्यांचा कायम बंदाेबस्त करीत नाही. त्यातच त्यांच्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई तुटपुंजी दिली जाते. त्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.