ठग समीर जोशीविरुद्धचा खटला येत्या ऑगस्टपर्यंत निकाली काढा - उच्च न्यायालय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 12, 2024 06:51 PM2024-02-12T18:51:53+5:302024-02-12T18:52:38+5:30
२ मार्च २०२२ रोजी उच्च न्यायालयाने हा खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश दिला होता.
नागपूर: विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून पाच हजारांवर गुंतवणूकदारांना २०० कोटींवर रुपयांनी लुबाडल्याचा आरोप असलेला श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी यांच्याविरुद्ध अकोला येथील विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेला खटला येत्या ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दिला. २ मार्च २०२२ रोजी उच्च न्यायालयाने हा खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश दिला होता. परंतु, विविध कारणांमुळे हा खटला आतापर्यंत निकाली निघू शकला नाही. परिणामी, सत्र न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजी उच्च न्यायालयाला अर्ज सादर करून मुदत वाढवून मागितली होती. त्या अर्जावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी सहा महिने मुदत वाढवून दिली.
घोटाळ्याचा मास्टरमाईंड जोशी गुंतवणूकदारांना वार्षिक २५ ते ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवित होता. भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांना या मायाजालात फसविण्यासाठी त्याने अनेक एजंट नियुक्त केले होते. तो वेळोवेळी गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना भूलवत होता. काही काळानंतर जोशीच्या आश्वासनानुसार गुंतवणूकदारांना परतावा व ठेवी भेटणे बंद झाल्यामुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. १४ सप्टेंबर २०१३ रोजी सोमलवाडा येथील अमित मोरे यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात जोशी व इतर आरोपींविरुद्ध पहिली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध अकोला व अमरावती येथील पोलीस ठाण्यांतही एफआयआर दाखल झाले.