नागपुरात गुंडांचा वाद, एकाची निर्घृण हत्या : पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:05 PM2019-11-12T22:05:45+5:302019-11-12T22:11:26+5:30
दोन गुंडांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन गुंडांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. पंकज नारायणरावजी कोंडलकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
पंकज एका लोहा कंपनीत काम करीत होता. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. तो श्रीरामनगरातील पराते पेट्रोल पंपामागे राहणाऱ्या नितीन लाकडे यांच्याकडे भाड्याने राहायचा. पंकजने २०११ मध्ये नंदनवनमध्ये एकाची हत्या केली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो लोहा कंपनीत काम करायचा. त्याचे विशाल तुमडे (वय २४, रा. गारगोटी, नरसाळा) नामक गुंडासोबत वैर होते. एक महिन्यापूर्वी त्यांच्यात कडाक्याचा वाद आणि हाणामारीही झाली होती. या वादात विशालचा मित्र नितीन टुले (वय ४९, रा. पवनपुत्रनगर, नागपूर) याने उडी घेतली. तेव्हापासून वाद तीव्र झाले. दोघेही एकमेकांना संपवण्याची धमकी देत होते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी विशाल, नितीन टुले, गोलू ऊर्फ काल्या कोहळे (वय ३०, रा. गारगोटी), आकाश मोरे (वय २३, रा. तुलाजीनगर) आणि अमित पाल (वय २५, रा. पवनपुत्रनगर) हे पंकजच्या रूमवर आले. त्यावेळी पंकज दारू पीत होता. आरोपींसोबत बाचाबाची झाली आणि आरोपी विशाल तसेच साथीदारांनी पंकजवर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून घरमालक नितीन लाकडे धावले. पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. आरोपी शिवीगाळ आरडाओरड करीत होते. आरोपी पळून गेल्यानंतर नितीन रंगनाथ लाकडे (वय ३०) याने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी पंकजला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन लाकडेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मंगळवारी सर्वच्या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
या निर्घृण हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. पोलिसांनी पंकजच्या रुमची झडती घेतली असता त्यात दारूच्या बाटल्या आढळल्या. गुंडांमधील वैमनस्यातूनच हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार विशाल तुमडे असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तुमडे तसेच नितीन टुले हे दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. तुमडेविरुद्ध घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल आहेत तर, टुले याने २०१५ मध्ये एकाची हत्या केली होती. त्याचा हत्येचा हा दुसरा गुन्हा आहे. अन्य आरोपींचा गुन्हेगारी अहवाल तपासला जात असल्याची माहिती ठाणेदार संदीप भोसले यांनी दिली.