काँग्रेसमधील वाद हायकोर्टात

By admin | Published: May 24, 2017 02:30 AM2017-05-24T02:30:54+5:302017-05-24T02:30:54+5:30

महानगरपालिकेत काँग्रेसचा गटनेता निवडण्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे.

The dispute in Congressional High Court | काँग्रेसमधील वाद हायकोर्टात

काँग्रेसमधील वाद हायकोर्टात

Next

मनपा गटनेता निवडण्याचे प्रकरण : महाकाळकर यांची याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेत काँग्रेसचा गटनेता निवडण्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी त्यांना गटनेतेपदावरून हटविण्याच्या आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी सोमवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त व नवनिर्वाचित गटनेते तानाजी वनवे यांना नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी सदर वादग्रस्त आदेश जारी केला आहे. त्यावर महाकाळकर यांचा आक्षेप आहे. विभागीय आयुक्तांना असा आदेश जारी करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा आदेश रद्द करून तानाजी वनवे यांची गटनेतेपदावरील निवड अवैध घोषित करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.
वनवे यांनी महाकाळकर यांच्यावर अविश्वास दर्शवून १६ मे रोजी वर्धा मार्गावरील प्रगती भवन येथे नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सदस्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत १७ सदस्य उपस्थित होते. त्यात वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.
त्यातील चार सदस्यांच्या स्वाक्षऱ्या बोगस असल्याचा दावा महाकाळकर यांनी नंतर केला होता. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी प्रकरणाची पडताळणी करण्याचा आदेश मनपाच्या निगम सचिवांना दिला होता. १७ मे रोजी झालेल्या पडताळणीत १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविला तर, नगरसेवक रमेश पुणेकर गैरहजर राहिले. मनपातील काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविल्यामुळे पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला. महाकाळकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अजय घारे यांनी बाजू मांडली.
 

Web Title: The dispute in Congressional High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.