नागपुरात भाड्याच्या जागेचा वाद पेटला : घरमालकाने लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 08:29 PM2020-06-19T20:29:15+5:302020-06-19T20:32:18+5:30
जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल केला.
विद्याधर रामधन माटे (वय ६५), मंगेश विद्याधर माटे, गुन्नू जयस्वाल आणि एक अनोळखी साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी माटे यांच्या मालकी हक्काची जागा सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगरात आहे. ती त्यांनी सुमित दिनेश तिडके (वय ४२) यांना भाडेतत्त्वावर दिली होती. तेथे तिडके यांनी सुमित वेस्टर्न इवेंट्स नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. काही दिवसांपासून जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरू आणि घरमालक यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यांच्यात अनेकदा खटकेही उडाले. या पार्श्वभूमीवर २८ मेच्या दुपारी तिडके यांच्या प्रोडक्शन हाऊसला आग लागली आणि त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जागामालक माटे आणि त्यांच्या साथीदारांनी पेट्रोल टाकून आपल्या प्रोडक्शन हाऊसला आग लावली आणि तेथील साहित्य चोरण्यासाठी आगीचा बनाव केल्याची तक्रार तिडके यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. या आगीत आपले दोन लाख, ४२ हजार रुपयांच्या सामानाचे नुकसान झाल्याचेही तिडके यांनी तक्रारीत नमूद केले होते. सोनेगाव पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले. महिनाभर चौकशी केल्यानंतर हवालदार ढोके यांनी या प्रकरणात आरोपी जागामालक विद्याधर माटे, त्यांचा मुलगा मंगेश, मित्र गुन्नू जयस्वाल आणि अन्य एक अशा चौघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.