गणेशपूरच्या ग्रामसभेत राेजगार सेवक नियुक्तीवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:46+5:302021-06-22T04:07:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : राेजगार सेवकाची नियुक्ती करण्याबाबत गणेशपूर (कलमुंडा) (ता. काटाेल) ग्रामपंचायत कार्यालयात साेमवारी (दि. २१) विशेष ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : राेजगार सेवकाची नियुक्ती करण्याबाबत गणेशपूर (कलमुंडा) (ता. काटाेल) ग्रामपंचायत कार्यालयात साेमवारी (दि. २१) विशेष ग्रामसभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या पदासाठी प्राप्त झालेल्या तीनपैकी एक अर्ज स्वाक्षरी नसल्याने रद्द ठरविण्यात आला. त्यामुळे वादाला ताेंड फुटले. शेवटी, ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.
या ग्रामपंचायतअंतर्गत गणेशपूर, कलमुंडा व शेकापूर या गावांचा समावेश आहे. सरपंच नत्थू नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पी.व्ही. खरळकर यांनी सकाळी १०.३० वाजता विशेष ग्रामसभेला सुरुवात केली. तत्पूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडी देऊन व ग्रामपंचायत कार्यालयात नाेटीस लावून राेजगार सेवक या पदासाठी अर्ज मागवले हाेते. तसेच ग्रामसभेची सूचनाही दिली हाेती.
उमेश काशिनाथ ढवंगळे कलमुंडा, राहुल सुरेश भोयर कलमुंडा व सुनील सुधाकर कोडापे शेकापूर या तिघांनी राेजगार सेवकपदासाठी अर्ज केले हाेते. छाननीदरम्यान अर्जावर स्वाक्षरी नसल्याने सुनीन काेडापे याचा अर्ज रद्द ठरविण्यात आला. शिवाय, सुरेश भाेयर याची राेजगार सेवकपदी निवड करण्यात आली. या निवडीवर ग्रामसभेत उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आक्षेप घेत हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे सांगितल्याने वादाला सुरुवात झाली. मात्र, दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाेलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढून शांत केले.
...
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निर्णय
राेजगार सेवकाची नियुक्ती ग्रामसभेत हाेणार नसल्याची नागरिकांनी आग्रही भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाेलिसांची मदत घेण्याचे ठरविले. माहिती मिळताच ठाणेदार विश्वास पुल्लरवार, पाेलीस उपनिरीक्षक राम ढगे ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. विश्वास पुल्लरवार यांनी दाेन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली व त्यांना शांत केले. या प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुढील निर्णय ठरविण्यात आले.
...
राेजगार सेवकाच्या नियुक्तीबाबत दवंडी दिली हाेती. शिवाय, ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर नाेटीस लावली हाेती. ग्रामस्थांना विशेष ग्रामसभेचीही सूचना दिली हाेती. त्याआधारे राेजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली.
- नत्थू नागपुरे,
सरपंच, गणेशपूर