आमदार आणि पोलिसांत वाद; नागपूरच्या तहसील ठाण्यात वातावरण गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 09:15 PM2019-09-03T21:15:06+5:302019-09-03T23:23:24+5:30

गंभीर गुन्ह्यात निरपराध तरुणाला गोवण्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि तहसील ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यात मंगळवारी रात्री वाद झाला.

Disputes between MLAs and police: The atmosphere in the Tahsil Police Station of Nagpur is hot | आमदार आणि पोलिसांत वाद; नागपूरच्या तहसील ठाण्यात वातावरण गरम

आमदार आणि पोलिसांत वाद; नागपूरच्या तहसील ठाण्यात वातावरण गरम

Next
ठळक मुद्दे ठाणेदारांच्या भूमिकेमुळे प्रकरण शांत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर गुन्ह्यात निरपराध तरुणाला गोवण्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि तहसील ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यात मंगळवारी रात्री वाद झाला. आधी चौकशी करा नंतरच कुणाला अटक करा, अशी मागणी आ. खोपडे यांनी लावून धरली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून ठाणेदारांनी प्रकरणाचा चौकशी अधिकारी बदलण्याची भूमिका घेतल्याने वातावरण शांत झाले. दरम्यान, या प्रकारामुळे तहसील ठाण्यातील वातावरण गरम झाले होते.


संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हातठेलेवाल्यांसोबत काही तरुणांचा वाद झाला. यावेळी दोन गटात जबर हाणामारी झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. जखमी हातठेलेवाल्याच्या तक्रारीवरून तहसीलचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. त्यांनी सहा आरोपींना यात अटक केली. आज आकरे नामक तरुणासह आणखी काही जणांना पोलिसांनी या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे नगरसेवक बाल्या बोरकर पोहचले. बोरकर यांच्यासोबत एपीआय पाटील यांचा वाद झाला. बोरकर यांनी ही माहिती देऊन आ. खोपडे यांना बोलवून घेतले. रात्री ७ च्या सुमारास खोपडे ठाण्यात पोहचले. मात्र, तोपर्यंत भाजपाचे अनेक कार्यकर्ते ठाण्याच्या परिसरात जमले होते.खोपडे यांनी यासंबंधाने एपीआय पाटील तसेच द्वितीय निरीक्षक सागर यांना निरपराध तरुणांना ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी कसे काय करू शकता, अशी विचारणा केली. यावरून गरमागरमी झाली. हाणामारी झाली तेव्हा तेथे हे (आज ठाण्यात आणलेले) तरुण होते, असे पोलीस म्हणाले. तर, भांडण झाल्यानंतर बघायला ५० जण येतात, तुम्ही काय ५० जणांना आरोपी करणार काय, असा प्रश्न आ. खोपडेंनी विचारला. दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्याऐवजी ठेलेवाल्यांकडून हप्ते मिळत असल्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी एकतर्फी कारवाई करीत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात चौकशी न करता ठेलेवाला सांगेल, त्याला पोलीस आरोपी बनवीत असल्याचेही खोपडे म्हणाले. आधी चौकशी करा, नंतरच कुणाला आरोपी करा, अशी मागणी आ. खोपडेंनी केली. ही गरमागरमी सुरू असताना ठाणेदार अरुण मालवीय तेथे पोहचले. त्यांनी आ. खोपडेंना शांत करीत चौकशी अधिकाऱ्यावर काही शंका असेल तर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करू, असे म्हणत प्रकरण शांत केले. त्यानंतर आ. खोपडे आणि भाजपा कार्यकर्ते ठाण्यातून निघून गेले. यासंबंधाने बोलताना ठाणेदार मालवीय म्हणाले की, गैरसमजातून ही गरमागरमी झाली. माझ्याशी संपर्क केला असता तर हा प्रकारच घडला नसता, असे ते लोकमतशी बोलताना म्हणाले. 

५० हजार आणि मोबाईल घेतला
 प्रकरण कमालीचे तापले असताना ठाण्यात असलेल्या आकरे नामक तरुणाने खोपडे यांच्याजवळ येऊन माझ्याकडून पोलिसांनी कारवाईचा धाक दाखवून ५० हजार रुपये आणि मोबाईल घेतल्याचे सांगितले. परिणामी आगीत तेल पडल्यासारखे झाले. तोच तरुण काही वेळेनंतर आला अन् आपली रक्कम तसेच मोबाईल परत केल्याचेही त्याने सांगितले. 

दोषी असेल तरच कारवाई : उपायुक्त माकणीकर 
पोलिसांचा कुणी शत्रू नसतो. कुणावर हेतुपुरस्सर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. फिर्यादी, आरोपींच्या बयानातूनच आरोपीचे नाव निष्पन्न केले जाते. याशिवाय कॉल डिटेल्स आणि अन्य पुरावेही लक्षात घेतले जातात. जर कुणी दोषी नसेल तर त्याला पोलीस नंतर डिस्चार्जही (दोषमुक्त) करतात. त्यामुळे कुणी दोषी नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे यासंबंधाने पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Disputes between MLAs and police: The atmosphere in the Tahsil Police Station of Nagpur is hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.