बोअरवेलवरून वाद पेटला; चाकूहल्ला, दगडफेक अन् वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 12:30 PM2022-01-05T12:30:30+5:302022-01-05T12:39:44+5:30
बोअरवेल लावण्यावरून दोन गटात वाद पेटला आणि त्याचे रुपांतर मारामारीत झाले. यात तुफान दगडफेक करून घर आणि वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपींनी विरोध करणाऱ्या एकावर चाकूहल्ला केला तर दुसऱ्याला विटेने ठेचून गंभीर जखमी केले.
नागपूर : आईच्या शेतात बोअरवेल लावण्यावरून झालेल्या वादामुळे एका गटाकडून त्यांच्या नातेवाइकावरच हल्ला करण्यात आला. तुफान दगडफेक करून घर आणि वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपींनी विरोध करणाऱ्या एकावर चाकूहल्ला केला तर दुसऱ्याला विटेने ठेचून गंभीर जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय जलाराम नगरात सोमवारी दुपारी ही घटना घडली.
राजेंद्र रामशिरोमनी तिवारी (५५) आणि अनिल दयानंद तिवारी (३५, चंडिकानगर) हे दोघे नातेवाईक आहेत. अनिलच्या आईच्या नावाने रिवा (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील मोहरिया (सिरमोर) येथे शेती आहे. या शेतात बोअरवेल लावण्यावरून राजेंद्र तिवारी आणि अनिल तिवारी यांच्यात वाद झाला होता. सोमवारी दुपारी ४ वाजता त्यावरून पुन्हा वाद पेटला. त्यातून आरोपी अनिलने त्याचे साथीदार वैभव राजेश सोमकुवर, राहुल राजवली साैंदिया तसेच सज्जन लवकुश दुबे यांना राजेंद्र तिवारीच्या घरावर दगडफेक करण्यासाठी पाठवले.
हल्ला झाल्याचे पाहून राजेंद्र यांचे शेजारी प्रदीप दिनेश तिवारी आणि छोटू नारायण दुबे (३२) मदतीला धावले. त्यामुळे आरोपींनी छोटू दुबेला चाकूने भोसकले तर प्रदीप तिवारी यांच्या डोक्यावर विटेने मारून त्यांनाही गंभीर जखमी केले. आरोपींनी राजेंद्र यांच्या वाहनाचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. राजेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.