नागपुरातील इमामवाडा भागातील बीअर बारमध्ये तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:43 PM2018-08-13T21:43:46+5:302018-08-13T21:44:36+5:30
धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर बीअर बारमध्ये तोडफोड करण्यात आली. इमामवाडा भागातील सिरसपेठ येथील आवारी चौकात असलेल्या प्रिया बीअर बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर बीअर बारमध्ये तोडफोड करण्यात आली. इमामवाडा भागातील सिरसपेठ येथील आवारी चौकात असलेल्या प्रिया बीअर बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दीपक मधुकर पराडकर (वय ४०, रा. नरसाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री शेख शाहिद शेख रंगरेज (वय २६, रा. गवळीपुरा) हा त्याच्या तीन साथीदारांसह बारमध्ये आला. बराच वेळ हे चौघे तेथे दारू पीत होते. त्यानंतर एका ग्राहकाचा शाहिदला धक्का लागल्याने त्याने व साथीदाराने तेथे वाद घातला. लगेच तेथे हाणामारी सुरू झाली. पराडकर यांच्या तक्रारीनुसार, शाहिद आणि त्याच्या साथीदारांनी पराडकर तसेच बारमधील ग्राहकांना मारहाण केली. बारमधील खुर्च्या तसेच ग्लासेसची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर बारमधील गल्ल्यात असलेले २५ ते ३० हजार रुपये लुटून नेले. पराडकर यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. शाहिदला अटक करण्यात आली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे कलाटणी
या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव होता. माहिती कळताच इमामवाड्याचे ठाणेदार रमाकांत दुर्गे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील गर्दी हटवून वातावरण शांत केले. माहिती कळताच मध्यरात्री पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनीही तिकडे धाव घेतली. उपायुक्त भरणे यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळाली. शाहिद आणि त्याच्या साथीदारांना बारमालक आनंद गायधने, योगेश गायधने आणि अन्य दोघांनीही मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी बारमालक गायधनेंसह चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात असल्याचे ठाणेदार दुर्गे यांनी सांगितले. बारचा गल्ला लुटला गेला की नाही, त्याचीही चौकशी सुरू असल्याचे दुर्गे यांनी सांगितले.