पार्किंग प्लाझात मनसे कार्यक र्त्यांची तोडफोड
By admin | Published: September 22, 2016 03:11 AM2016-09-22T03:11:09+5:302016-09-22T03:11:09+5:30
सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकातील नागपूर सुधार प्रन्यासच्या मल्टिलेव्हल कार पार्किं ग प्लाझातील
आंदोलकांनी व्यक्त केला संताप : कोट्यवधी खर्च करून उपयोग काय?
नागपूर : सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकातील नागपूर सुधार प्रन्यासच्या मल्टिलेव्हल कार पार्किं ग प्लाझातील भ्रष्टाचाराच्या विरोधात बुधवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकाकडून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर रास्तारोको केला. जोरदार नारेबाजी करीत कार पार्किंग प्लाझात तोडफोड केली. यामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनाचे स्वरुप विचारात घेता तातडीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
पार्किंग प्लाझात कंत्राटाराची मनमानी सुरू आहे. त्यांच्या मर्जीनुसार कार पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाते. इतरांच्या कारला येथे प्रवेशही दिला जात नाही. यासंदर्भात नासुप्रकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत पावर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी कार पार्किंग प्लाझाकडे धाव घेतली. आंदोलकांचा संताप बघून पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. परंतु कंत्राटदार वा जबाबदार व्यक्ती चर्चेसाठी पुढे आली नाही. ४-५ पोलीस कर्मचारी तैनात होते. आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होेते. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर गाड्या आडव्या करून रस्ता रोखला. त्यानंतर सीताबर्डी पोलीस स्टेशनचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
काही कार्यक र्त्यांनी ३८ वाहने पार्किंगसाठी आणली होती. तसेच प्रशांत पवार यांनी फॉर्च्यूनर डस्टर, इनोव्हा, टाटा सफारी अशा मोठ्या गाड्यांचे पार्किंग करण्यासाठी त्यांनी व्यवस्थापकाला विनंती केली. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या गाड्या पार्क करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता मोठ्या गाड्या लिफ्ट पॅलेटवर उभ्या करता येत नाही. तसेच ज्या मजल्यावर गाड्या उभ्या केल्या जातात तेथील उंचीमुळे मोठ्या गाड्या पार्किंग करता येत नसल्याचा प्रकार निदर्शनास आला.
नासुप्रने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पार्किंग प्लाझाचे बांधकाम सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे, उमेश बोरकर, अॅड. रणजित सारडे, महेश जोशी, इक्बाल रिझवी, सुश्रुत खेर, श्याम पुनियानी, अरुण तिवारी, महेश माने, महिला सेनेच्या संगीता सोनटक्के, मनीषा पापडकर, राज आंभोरे, कल्पना चव्हाण, शीला सारवणे, छाया सुखदेवे, अक्षय वैद्य, नागेश वानखेडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
नासुप्रच्या अधिकाऱ्यांना बोलावले
नासुप्रच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांचा संताप विचारात घेता काहीवेळाने नासुप्रचे अभियंता पंकज अंभोरकर घटनास्थळी आले. पार्किंग प्लाझात मोठ्या गाड्यांना पार्किंगची अनुमती का नाही, असा प्रश्न प्रशांत पवार यांनी केला, यावर अंभोरकर यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
दादागिरी चालणार नाही
नासुप्रचे पार्किंग प्लाझा सामान्य नागरिकांसाठी आहे. परंतु येथे त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी अनुमती नाकारली जाते. या प्रकरणाची चौकशी का करीत नाही. असा प्रश्न आंदोलकांनी केला. कंत्राटदाराची दादागिरी चालणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार
पार्किंग प्लाझातील भ्रष्टाचाराला नासुप्रचे अधिकारी जबाबदार असल्याने प्रशांत पवार यांनी त्यांच्या विरोधात सीताबर्डी पोलिसात तक्रार नोंदविली. या प्रकरणाची आठ दिवसांत चौकशी न केल्यास या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पवार यांनी यावेळी दिला.