नागपूर-काटोल महामार्गात ‘टायगर कॉरिडॉर’चे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 08:00 AM2022-11-17T08:00:00+5:302022-11-17T08:00:06+5:30
Nagpur News नागपूर-काटोल या महामार्गातून पूर्व विदर्भातील ‘टायगर कॉरिडॉर’जात असल्याची बाब उपस्थित झाली असल्याने वन विभागाचे क्लिअरन्स मिळविणे आवश्यक झाले आहे. परिणामी साडेबारा किमी रस्त्याचे काम बंद पडले आहे.
आनंद डेकाटे
नागपूर : नागपूर-काटोल या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. वर्ष झाले आहे. परंतु, मध्येच या महामार्गातून पूर्व विदर्भातील ‘टायगर कॉरिडॉर’जात असल्याची बाब उपस्थित झाली असल्याने वन विभागाचे क्लिअरन्स मिळविणे आवश्यक झाले आहे. परिणामी साडेबारा किमी रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर -काटोल हा महामार्ग ४८.२ किमीचा महामाार्ग आहे. एकूण ५९० कोटी रुपयाच्या या प्रकल्पाच्या कामाला २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात झाली. स्टेप वन व स्टेप २ या दोन्हीचे क्लिअरन्स घेण्यात आले. रस्त्याचे काम सुरू असतानाच या महामार्गाअंतर्गत पूर्व विदर्भातील वन्य जिवांच्या भ्रमणाचा मार्ग ‘टायगर कॉरिडॉर’ प्रस्तावित असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे वन विभागाने यावर आक्षेप घेतला. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्पातील काही गावेसुद्धा या चारपदरीकरणाच्या कामात येत असल्याची बाब उपस्थित करण्यात आली. असे एकूण साडेबारा किमीचा मार्गासंदर्भात वाईल्ड लाईफची मंजुरी घ्यावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्य वाईल्ड लाईफची मंजुरी घेतली आहे. त्या अंतर्गत २.८७ कोटी रुपये भरण्यात आले. त्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्तावित आहे. परिणामी एकूण साडेबारा किमीचे काम बंद पडले आहे.
उर्वरित ३६ किमी महामार्गाचे काम सुरू आहे. २४ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. एक वर्ष झाले आहे. वर्षभरात १२ टक्केच काम झाले आहे. यातच ‘टायगर कॉरिडॉरचा विषय आला. त्यामुळे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे.
महामार्गातून ‘टायगर कॉरिडॉर प्रस्तावित असल्याने साडेबारा किमीचे काम बंद आहे. या संदर्भात राज्य वाईल्ड लाईफची मंजुरी मिळाली आहे. सध्या केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्ताव आहे. उर्वरित महामार्गाचे काम सुरू आहे.
विलास पी. ब्राह्मणकर, महाव्यवस्थापक (तंत्रिक) परियोजन निदेशक, राष्ट्रीय महामार्ग
- मुख्य वैशिष्ट्ये
- नागपूर-काटोल चार पदरी रस्त्याची लांबी - ४८.२ किमी
- एकूण खर्च ५९० कोटी
- ११ कि.मी.चा नवीन बायपास
- १७२ हेक्टरचे भूमी अधिग्रहण जवळपास पूर्ण