उच्च शिक्षण सहसंचालकांविरोधात प्राध्यापकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:43 PM2020-05-29T22:43:51+5:302020-05-29T22:45:26+5:30
लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालये बंद असून प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले होते. लॉकडाऊनदरम्यान केलेली कामे व पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आले होते. याबाबत आवश्यक तपशील अनेक महाविद्यालयांकडून सादर करण्यात आले असले तरी सहसंचालक डॉ. एम. एस. साळुंखे यांच्या भूमिकेबाबत प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालये बंद असून प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले होते. लॉकडाऊनदरम्यान केलेली कामे व पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आले होते. याबाबत आवश्यक तपशील अनेक महाविद्यालयांकडून सादर करण्यात आले असले तरी सहसंचालक डॉ. एम. एस. साळुंखे यांच्या भूमिकेबाबत प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
या सत्रामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाची (पारंपरिक पद्धतीने/ऑनलाईन) माहिती महाविद्यालयांना मागवली होती. तसे पत्र उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले होते. प्रपत्र अ नुसार अभ्यासक्रमाची माहिती देण्यास प्राध्यापक वर्गाने सहमती दर्शवली होती. मात्र, यासोबत असलेल्या प्रपत्र ब मध्ये प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात कुठले काम केले, किती वेबिनारला उपस्थिती लावली, संशोधनात्मक कार्य काय होते, इत्यादीची माहिती मागविण्यात आली होती. याला नुटातर्फे विरोध करण्यात आला होता. मुळात सहसंचालकांना ही माहिती मागविण्याचा अधिकारच नाही. अभ्यासक्रमाची माहिती विद्यापीठाने मागितली असती तर ती लगेच दिली असती. मात्र सहसंचालकांचे अभ्यासक्रमाशी काहीच देणेघेणे नाही, अशी भूमिका संस्थेने घेतली होती.
यानंतर सहसंचालकांनी नवे पत्र काढले. त्यानुसार केवळ अभ्यासक्रमाची माहिती तात्काळ सादर करा व इतर माहिती महाविद्यालय स्तरावर जमा करावी अशी सूचना केली. अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रमाची माहिती सादर केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी सहसंचालकांशी संपर्क होऊ शकला नाही.
शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल कुठे ?
लॉकडाऊनच्या कालावधीत काय काम केले यासंदर्भात माहिती मागविण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन तर अद्यापही सुरू आहे व विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार शैक्षणिक सत्र संपले आहे. या स्थितीत प्राध्यापकांनी सत्र संपल्यावर काय काम केले याची माहिती कशी द्यावी हा आमचा आक्षेप होता. शिवाय विद्यापीठाने शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केलेले नाहीत. त्यामुळे माहिती देणे क्रमप्राप्त नव्हतेच, असे नुटाचे उपाध्यक्ष डॉ.नितीन कोंगरे यांनी सांगितले.