लस मिळत नसल्याने टीसींमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:07 AM2021-03-18T04:07:57+5:302021-03-18T04:07:57+5:30
नागपूर : रेल्वे गाड्यांत तसेच रेल्वे स्थानकावर टीसींचा दररोज हजारांवर प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची लस देणे गरजेचे ...
नागपूर : रेल्वे गाड्यांत तसेच रेल्वे स्थानकावर टीसींचा दररोज हजारांवर प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची लस देणे गरजेचे आहे. परंतु, टीसींनाच लस देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे.
रेल्वे स्थानकावर टीसी, बूकिंग क्लार्क, आरपीएफ कर्मचारी, सफाई कर्मचारी हे प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ४५ वर्षांवरील मधुमेह, रक्तदाब असलेल्या टीसींनाच कोरोनाची लस देण्यात येत आहे. रेल्वेगाडीत टीसी दिवसभर हजारावर प्रवाशांच्या संपर्कात येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी त्यांना आधी कोरोनाची लस देणे गरजेचे आहे. परंतु, नागपूर विभागात अद्यापही टीसींना कोरोनाची लस देण्यात आली नसल्यामुळे त्यांच्यात रोष पसरला आहे.
रेल्वेचे सर्व कर्मचारी फ्रंटलाईन स्टाफमध्ये येत असून, ते प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याचे सांगून सर्वांनाच कोरोनाची लस देणे गरजेचे असल्याचे मत नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष देबाशिष भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या नियमानुसार फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असल्याचे जनसंपर्क अधिकारी एस.जी. राव यांनी सांगितले.
..............
एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळाली नाही लस
एसटीचे चालक, वाहक प्रवाशांच्या थेट संपर्कात येतात. दिवसभरात एक चालक-वाहक शेकडो प्रवाशांची वाहतूक करतो. परंतु, अद्यापही एसटी महामंडळाच्या चालक-वाहक तसेच प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आलेली नाही. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ६७५ चालक, २३५ चालक कम वाहक आणि ७३५ वाहक आहेत. ते थेट प्रवाशांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लस देण्याची गरज आहे. याबाबत एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी एसटीचे चालक-वाहक प्रवाशांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांना तातडीने कोरोनाची लस देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
........