संभाजींचा इतिहास नसानसात भिनावा : अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:03 PM2018-12-13T23:03:31+5:302018-12-13T23:06:32+5:30
विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट्यात संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट्यात संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान आणि मोहन मते मित्र परिवारातर्फे ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन २२ ते २८ डिसेंबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर करण्यात आले आहे. या नाटकात संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संभाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे केवळ महानाट्य नसून महाराष्ट्रातील मातीचा संस्कार आहे. हा संस्कार महाराष्ट्र आणि इतर राज्यात पोहोचविण्याचा मानस आहे. महाराष्ट्रात शिवपुत्र संभाजीचे १३६ प्रयोग झाले. आजपर्यंत विदर्भात संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला नव्हता. त्यामुळे विदर्भात महानाट्याचे आयोजन ही खरोखरच आनंदाची बाब आहे. आजपर्यंत घडले नाहीत असे उदंड प्रतिसादाचे प्रयोग नागपुरात घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, महानाट्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी महाराजांवर एकही चित्रपट निघाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन मते यांनी महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात असून नागपूरचे वातावरण संभाजीमय झाले असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला माजी महापौर प्रवीण दटके, संजय खुळे, बिज्जु पांडे, राजेश छाबरानी, शाम दलाल, तुषार फडणवीस, शशी शुक्ला, पंकज ठाकरे, विश्वास महादुरे, बंटी कुकडे उपस्थित होते.