मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:37+5:302021-03-31T04:07:37+5:30
नागपूर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात या वयावरील जवळपास ...
नागपूर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात या वयावरील जवळपास १० लाख लोक आहेत. याशिवाय, हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ६० वर्षांवरील लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे. २८ मार्चपासून दुसऱ्या डोसला सुरुवातही झाली आहे. परिणामी, मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यात ‘हेल्थ वर्कर’ला प्राधान्य देण्यात आले. १५ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्करचे लसीकरण व दुसरा डोस देणे सुरू झाले. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. परंतु मागील अडीच महिन्याचा अनुभव लक्षात घेता, मागणीच्या तुलनेत लसीचा कमी पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. दरम्यानच्या काळात नागपूर शहरात कमी डोस शिल्लक असल्याने उसनवारी तत्त्वावर भंडारा व गोंदिया येथून डोस मागवावे लागले होते.
- चार दिवसात लागतात एक लाख डोस
आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, २६ मार्च रोजी १ लाख ४९ हजार ८०० डोस मिळाले. यातील १ लाख २७ हजार २०० डोस नागपूर जिल्ह्याला देण्यात आले. उर्वरित डोस गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पाठविण्यात आले. पुढील दोन दिवसात आणखी सुमारे दीड लाख डोस येण्याची शक्यता आहे. यासाठी पुण्याच्या आरोग्य विभागाकडे वाहन पाठविल्याची माहिती आहे. हे दोन्ही डोस कोविशिल्डचे आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा यात समावेश नाही. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत रोज जवळपास २० हजार डोस दिले जातात. १ एप्रिलपासून यात वाढ होऊन ही संख्या ३० हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यामुळे चार दिवसात साधारण एक लाख डोसची गरज पडणार आहे. मागणीनुसार लसीचा पुरवठ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाभार्थ्यांची केंद्रावर गर्दी वाढण्याचीही शक्यता आहे.
- २ लाख १३ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुट्यांचे दिवस वगळता जवळपास ६० दिवसात १ लाख ९३ हजार ३५० लाभार्थ्यांनी पहिला डोस तर, १९ हजार ८८६ लाभार्थ्यांनी दुसरा डोस असे एकूण २ लाख १३ हजार २१६ जणांचे लसीकरण झाले. यात पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये ३७ हजार ४४३ हेल्थ वर्कर, २५ हजार ८७ फ्रंट लाईन वर्कर, ३१ हजार ४३८ गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील लाभार्थी तर ९९ हजार ३८२ ज्येष्ठ नागरिक आहेत. दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये १३ हजार ६७७ हेल्थ वर्कर तर ६ हजार १८९ फ्रंट लाईन वर्कर आहेत.
: हेल्थ वर्कर:
पहिला डोस :३७,४४३
दुसरा डोस:१३,६७७
:फ्रंट लाईन वर्कर:
पहिला डोस: २५,०८७
दुसरा डोस : ६,१८९
:ज्येष्ठ नागरिक :
पहिला डोस :९९ हजार ३८२
:४५ वर्षांवरील गंभीर आजार असलले :
पहिला डोस ३१ हजार ४३८