काेथुर्णा शिवारातील दारूभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:55+5:302021-05-07T04:08:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेथुर्णा शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेथुर्णा शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून ती दारूभट्टी उद्ध्वस्त केली. यात चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
दादाराव सुभाष हरकरे (३१), मयूर धनराज केवटे (२४), पंचम माखन राणेकर (२५) व माेनिनसिंग माेतीसिंग बैस (३५) सर्व रा. काेथुर्णा, ता. सावनेर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापा परिसरात गस्तीवर हाेते. त्यातच त्यांना काेथुर्णा शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांना या शिवारातील दाट झुडपांमध्ये दारूभट्टी आढळून येताच त्यांनी धाड टाकली.
यात चाैघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ५,६०० लिटर माेहफुलाचा सडवा, ३०० लिटर माेहफुलाची दारू, ड्रम, दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय, ती भट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे, सहायक फाैजदार बाबा केचे, पाेलीस हवालदार नाना राऊत, शिपाई राजेंद्र रेवतकर, राेहन डाखाेरे, विपीन गायधने, अमाेल वाघ, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.