गुण वाटपात भेदभाव, विद्यार्थिनी हायकोर्टात
By admin | Published: June 15, 2017 02:16 AM2017-06-15T02:16:31+5:302017-06-15T02:16:31+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीतील गणित, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेमध्ये
सीबीएसईतील प्रकरण :
१९ जूनपर्यंत मागितले उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीतील गणित, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारल्या गेल्यामुळे दिल्ली विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण देण्यात आले आहेत. परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले, असा दावा एका विद्यार्थिनीने केला आहे. यासंदर्भात तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
आयुषी दीक्षित असे विद्यार्थिनीचे नाव आहे. न्यायालयाने बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मंडळाला नोटीस बजावून १९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. १० गुणांचे गणिताच्या तर, प्रत्येकी ८ गुणांचे जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते. परिणामी विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळाने दिल्ली विभागातील विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण दिले आहे.
परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मंडळाची ही वागणूक भेदभावपूर्ण आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आयुषीतर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.