रेशनच्या दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 01:03 AM2020-06-19T01:03:47+5:302020-06-19T01:05:29+5:30
रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली.
प्रमोद शिवकुमार पोद्दार व्यंकटेशनगर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी शीलादेवी यांच्या नावावर रेशन कार्ड आहे. त्याचा नंबर २७२००९१६४३४२ आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ जून रोजीची ही घटना आहे. गजानन गुजर यांच्या रेशन दुकानामधून ( एफपीएस नंबर २५०५००११००७७) जून महिन्याचे रेशन खरेदी केले. आज जेव्हा गहू निवडण्यासाठी काढले तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणावर माती व कचरा मिसळल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या आॅफिशियल पोर्टलवर तक्रार केली तेव्हा त्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी फोन केला आणि तुमचा गहू रेशन दुकानदाराला परत करा, तो बदलून देईल, असे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार
लोकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटले जात असल्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. परिसरातील माजी नगरसेवक महेंद्र राऊत आणि हितेश जोशी यांनी संयुक्तपणे पूर्व नागपुरातील सर्व रेशन दुकानांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.