नागपूर जिल्ह्यात १४.७७ लाख एलईडी बल्ब वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 10:40 PM2021-03-19T22:40:31+5:302021-03-19T22:43:33+5:30
Distributed 14.77 lakh LED bulbs केंद्र सरकारने शुक्रवारी देशातील पाच जिल्ह्यांमध्ये ग्राम उजाला योजना लागू करण्याची घोषणा केली. त्यात नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत केवळ ग्रामीण भागामध्ये १० रुपयात एलईडी बल्ब दिले जातील. २०१५ मध्ये संपूर्ण जिल्ह्याकरिता उजाला योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत १४ लाख ७७ हजार ५८७ एलईडी बल्ब वितरित करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने शुक्रवारी देशातील पाच जिल्ह्यांमध्ये ग्राम उजाला योजना लागू करण्याची घोषणा केली. त्यात नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत केवळ ग्रामीण भागामध्ये १० रुपयात एलईडी बल्ब दिले जातील. २०१५ मध्ये संपूर्ण जिल्ह्याकरिता उजाला योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत १४ लाख ७७ हजार ५८७ एलईडी बल्ब वितरित करण्यात आले आहेत.
दोन्ही योजनांमध्ये बल्बच्या किमतीचा फरक आहे. पहिल्या योजनेत सुरुवातीला ९० रुपयात ७ वॉटचा बल्ब दिला जात होता. त्यानंतर ६५ रुपयात ९ वॉटचा बल्ब देणे सुरू झाले. ग्राहकांना वीज बिल दाखवल्यानंतर हे बल्ब दिले जात होते. याशिवाय कार्यक्षेत्राच्या बाबतीतही या योजनांमध्ये फरक आहे. ग्राम उजाला योजना केवळ ग्रामीण क्षेत्रात कार्यान्वित होईल तर, उजाला योजना संपूर्ण जिल्ह्याला लागू होती. ग्राम उजाला योजना कुणाच्या माध्यमातून राबवली जाईल, हे सध्या निश्चित झाले नाही; परंतु ही योजना महावितरणच्या माध्यमातूनच राबवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उजालाचे चारच केंद्र बाकी
उजाला योजनेच्या सुरुवातीला महावितरणच्या सर्वच कार्यालयापुढे एलईडी बल्बचे स्टॉल लावण्यात आले होते. सध्या केवळ चारच ठिकाणी स्टाॅल आहेत. त्यात बुटीबोरी, काँग्रेस नगर, गड्डीगोदाम व शंकर नगर येथील कार्यालयांचा समावेश आहे.