स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट मक्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:48+5:302021-04-02T04:08:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शासनाने काही शिधापत्रिकाधारकांना गव्हाला पर्याय म्हणून मक्याचे काही प्रमाणात वाटप करायला सुरुवात केली. मार्चमध्ये ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शासनाने काही शिधापत्रिकाधारकांना गव्हाला पर्याय म्हणून मक्याचे काही प्रमाणात वाटप करायला सुरुवात केली. मार्चमध्ये करण्यात आलेल्या धान्य वाटपात लाभार्थ्यांना देण्यात आलेला मका अत्यंत निकृष्ट प्रतीचा हाेता. त्यामुळे अनेकांनी हा मका खरेदी करण्यास नकार दिला. शिवाय, काहींनी याबाबत तालुका पुरवठा विभागाकडे तक्रारही केली आहे. हा प्रकार कढाेली (ता. कामठी) येथे घडला आहे.
शासनाने लाभार्थ्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाच्या काेट्यात अलिकडे कपात केली आहे. या लाभार्थ्यांना गव्हासाेबतच मकाही खरेदी करायला लावला जात आहे. अनेकांचा नाईलाज असल्याने ते गव्हासाेबतच मकाही शासकीय दराने खरेदी करतात. मात्र, मार्चमध्ये वाटप करण्यात आलेल्या धान्यामधील मक्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची माहिती अनेक लाभार्थ्यांनी दिली. हा मका खाण्यायाेग्य नसल्याने आपण खरेदी करण्यास नकार दिल्याचेही काहींनी सांगितले.
कढाेली येथे गुलाबराव खंते यांचे परवानाधारक स्वस्त धान्याचे दुकान आहे. याच दुकानातून निकृष्ट प्रतीचा मका मिळाल्याची माहिती कमलाबाई काकडे (रा. कढाेली) या लाभार्थ्याने दिली. हा प्रकार महागाई व महामारीच्या काळात गरिबांची थट्टा करणारा असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. दुसरीकडे आपल्याला जाे मका प्राप्त झाला, त्याच मक्याचे आपण वाटप केल्याची माहिती दुकानदार गुलाबराव खंते यांनी दिली. ही समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालयात तक्रार केल्याची माहिती नागरिकांनी दिली. या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना काेराेनाची लागण झाल्याने त्यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.
...
ज्वारी व मका नकाे, गहू द्या
ही धान्य कपात मार्चपासून लागू करण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तिंनी दिली. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति व्यक्ती तीन रुपये प्रतिकिलाे दराने दाेन किलाे तांदूळ, दाेन रुपये प्रतिकिलाे दराने दाेन किलाे गहू, एक रुपया प्रतिकिलाे दराने पाच किलाे मका आणि एक रुपया प्रतिकिलाे दराने पाच किलाे ज्वारीचे मार्चमध्ये वाटप करण्यात आले. ज्वारी पूर्णपणे काळी असल्याने ती कुणीही खरेदी केली नाही. ज्वारी व मका निकृष्ट प्रतीचा व खाण्यायाेग्य नसल्याने या दाेन्ही धान्याचे वाटप बंद करावे तसेच त्याऐवजी गहू देण्यात यावा, अशी मागणीही लाभार्थ्यांनी केली आहे.