वृत्तपत्रांचे वितरण आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:46 AM2020-04-01T00:46:19+5:302020-04-01T00:47:58+5:30
सर्व वृत्तपत्रांच्या वितरणाला बुधवारपासून (१ एप्रिल) सुरुवात होणार आहे. विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व वृत्तपत्रांच्या वितरणाला बुधवारपासून (१ एप्रिल) सुरुवात होणार आहे. विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी ही माहिती दिली. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरत असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. वृत्तपत्रे सुरक्षित होती आणि आता कोरोना संसर्गाच्या काळातही ती सुरक्षित आहेत असेदेखील त्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून वृत्तपत्र वितरण बंद होते. बुधवारपासून वितरणाला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. संघटनेच्यावतीने एजंटस् व हॉकर्सना सॅनिटायझर, मास्क व ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सुरक्षा साधनांचे मंगळवारपासून वितरण सुरू झाले. ते पुढेही कायम राहणार आहे असे चांडक यांनी स्पष्ट केले.
वाचकांनी सहकार्य करावे
वाचकांनी वृत्तपत्र वितरणाला सहकार्य करावे. सध्या वृत्तपत्रांविषयी वेगात अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु, या परिस्थितीत विश्वसनीय बातम्या व सूचनांसाठी वृत्तपत्रांचे प्रकाशन व वितरण होणे अत्यंत गरजेचे आहे. वाचकांचे सहकार्य मिळाल्यास हे कार्य अधिक सहजतेने पूर्ण केले जाऊ शकते, असे चांडक यांनी सांगितले.
वृत्तपत्रे सुरक्षित आहेत
जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्रे सुरक्षित असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रांद्वारे कोरोना व्हायरसचा फैलाव होत नाही असेही संघटनेने सांगितले आहे.