‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’चे आज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 10:30 AM2022-05-04T10:30:25+5:302022-05-04T10:35:53+5:30
‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या वितरणाचा दुसरा सोहळा बुधवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता हॉटेल सेंटर पॉइंट येथे होत आहे.
नागपूर : ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या वितरणाचा दुसरा सोहळा बुधवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता हॉटेल सेंटर पॉइंट येथे होत आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस समारंभाचे मुख्य अतिथी असून, लोकमत एडिटोरियल ग्रुपचे चेअरमन व राज्यसभा सदस्य (१९९८-२०१६) विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या निमित्त मुंबईतील ख्यातनाम फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी यांचे ‘आजची जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विदर्भातील नामवंत डॉक्टर आणि समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
अवॉर्डच्या अंतिम ज्युरी बोर्डाची बैठक रविवारी, १ मे रोजी पार पडली. यात सदस्यांनी विस्तृत चर्चा करून नामनिर्देशित व्यक्तींचे मूल्यांकन केले व त्यानंतर पुरस्कार विजेत्यांची निवड केली होती. ज्युरींमध्ये ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ फिजिशियन डॉ. एस. एन. देशमुख, सचिव आणि ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, वरिष्ठ ईएनटी, हेड ॲण्ड नेक सर्जन डॉ. मदन कापरे, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख, ज्येष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. साधना देशमुख, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, अकादमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, जगप्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर सुनील जोशी यांच्यासह लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक सहभागी होते.
लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर पुरस्कार डॉक्टरांना कामगिरीच्या आधारे दिले जातात. वैयक्तिक कामगिरीच्या आधारे ही निवड केली जाते. तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे जनमताचा कौलही घेतला जातो.
जीवनगौरव पुरस्कार, यंग अचिव्हर्स अवॉर्ड या पुरस्कारांचा यात सहभाग असून, यावर्षी नव्याने तीन अवॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. यात आंतरराष्ट्रीय अवाॅर्ड, कोविड वॉरिअर्ससाठी विशेष अवॉर्ड आणि विशेष ज्युरी अवॉर्डसह सार्वजनिक आरोग्यातील उत्कृष्ट योगदानाचा समावेश आहे.
वैद्यकीय व्यवसाय हा अत्यंत पवित्र व्यवसाय असून, तो मानवी मूल्यांशी खोलवर जडलेला आहे. या व्यापक क्षेत्रात सेवारत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांचे मोठे योगदान आहे. यामुळेच लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्सच्या निमित्ताने लोकमत मीडियाने वैद्यकीय क्षेत्रातील सेवारतांच्या सन्मानासाठी हे पाऊल उचलले आहे.