दररोज शेकडो प्रवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वितरण
By नरेश डोंगरे | Published: May 12, 2024 12:01 AM2024-05-12T00:01:45+5:302024-05-12T00:01:58+5:30
सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांचाही सहभाग : गरमी अन् उकाड्यात रेल्वे प्रवाशांना दिलासा
नागपूर : सेवाभावी व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर दररोज सुमारे दोन हजारांवर रेल्वे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.
उन्हाळ्यात दरवर्षी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. उन्हाचा तडाखा आणि प्रचंड गर्दीमुळे शरीरातून घामाच्या धारा निघतात. उकाड्यामुळे शरीराला थोड्या थोड्या वेळेनंतर पाण्याची गरज भासते. मात्र, प्रत्येकच प्रवाशी खास करून ज्येष्ठ नागरिक, गाडीच्या खाली उतरून स्टॉलवर किंवा नळावर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. अनेक जण पाण्याची बाटली विकत घेऊ शकत नाही. ते ध्यानात घेऊन त्यांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मांडली होती. त्यानुसार, ठिकठिकाणच्या सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांना आवाहन करण्यात आले. त्याला अनेकांनी दाद दिली. त्यातून १४ एप्रिल २०२४ पासून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, सेवाग्राम आणि आमला यासह अनेक रेल्वे स्थानकांवर हा उपक्रम राबविला जात आहे. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते, अशा गाड्यांच्या सामान्य आणि स्लीपर कोचजवळ जाऊन रेल्वे प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. साधारणत: दरदिवशी एका स्थानकावर दोन हजारांवर प्रवाशांना ही सुविधा दिली जात आहे. गर्दी आणि उकाड्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांना या स्तुत्य उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
अधिकारीही देत आहेत सेवा
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, सेवा भाव जपणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकारीही स्वत: रेल्वे प्रवाशांना मोफत पाणी देण्याच्या उपक्रमात सहभागी होत आहेत. काही ठिकाणच्या संघटना बिस्किट पॅकेट आणि फळांचेही वाटप करीत असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले आहे.