राज्यात आतापर्यंत १.२० कोटी घरापर्यंत श्रीराम अक्षतांचे वितरण

By योगेश पांडे | Published: January 19, 2024 07:43 PM2024-01-19T19:43:29+5:302024-01-19T19:43:44+5:30

नागपुरात मुस्लिम बांधवही लावणार दिवे : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून सामाजिक समरसतेचा संदेश

Distribution of Shri Ram Akshat to 1.20 crore households in the state so far | राज्यात आतापर्यंत १.२० कोटी घरापर्यंत श्रीराम अक्षतांचे वितरण

राज्यात आतापर्यंत १.२० कोटी घरापर्यंत श्रीराम अक्षतांचे वितरण

नागपूर : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जागोजागी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. विशेषत: अक्षत वितरणाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचून विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रामनामाचे जप करण्याचे आवाहन केले. राज्यभरातील ९० ते ९५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत १.२० कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.

२२ जानेवारी रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये आरत्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने सखोल नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेमध्ये या आरत्यांचे आयोजन होणार आहे. विशेष म्हणजे श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांच्या हस्ते आरती व्हावी यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र, गोव्यात मिळून लहानमोठ्या प्रकारचे सुमारे १ लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विहिंपचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली.

नागपुरात सामाजिक समरसतेचे उदाहरण
नागपुरात अनेक मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन धर्मीय बांधवांच्या घरीदेखील अक्षत वितरण करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी नागपुरातील टेकानाका परिसरातील मुस्लिम बांधव दिवे लावून या सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. याशिवाय शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये १३ हजार दिवे लावण्यात येणार आहेत. पुर्व नागपुरातील काही बौद्ध वस्त्यांमध्येदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जगासमोर सामाजिक समरसतेचे उदाहरण मांडण्यात येणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.

अयोध्येत जटायूचे अगोदर होणार पूजन
कारसेवेदरम्यान अनेक कारसेवकांना प्राण गमवावे लागले होते. रामायणात जटायूने रामनाम घेत सर्वात अगोदर बलिदान केले होते. त्यामुळे अयोध्येतील राममंदिरात अगोदर जटायूची मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती म्हणजे बलिदान करणाऱ्या कारसेवकांचे प्रतिक आहे. पंतप्रधानदेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी अगोदर जटायूचे पूजन करतील, असे शेंडे यांनी सांगितले.

Web Title: Distribution of Shri Ram Akshat to 1.20 crore households in the state so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.