नागपूर मनपाच्या १५७ सफाई कामगारांना स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:42 PM2019-03-09T22:42:54+5:302019-03-09T22:45:55+5:30
नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजित बांगर हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजित बांगर हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्या हस्तलकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, एसबीएम विकास कौन्सिलचे अध्यक्ष सतीश सिरसवान, आरोग्य विभागाचे किशोर मोटघरे, राजेश लवारे, विशाल मेहता उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती देणे व जमादारांच्या वारसांना नियुक्ती कार्ड मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे कार्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावल्या. त्यामुळे आज १५७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश मिळत आहेत. मात्र या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांनी पुढाकार घेतला असला तरी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान असल्याचे संदीप जोशी म्हणाले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माजी महापौर प्रवीण दटके व तत्कालीन सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मलवाहक जमादारांच्या नेत्यांकडूनही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे या समस्या तातडीने मार्गी लावता आल्या, असेही सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.
नागपूर शहर स्वच्छ, सुंदर होत आहे. शहराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात सफाई कर्मचाºयांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी शहरातील घाण साफ करण्याचे मौलिक कार्य हे सफाई कर्मचारी करतात. असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी केले.
सर्व ऐवजदार, सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित केली. यामध्ये सर्व ऐवजदारांना मनपामध्ये स्थायी नोकरी देणे व ऐवजदारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करून त्यांना नोकरी देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व ऐवजदारांना लाड-पागे समितीच्या शिफारशींतर्गत मनपामध्ये स्थायी नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता.
अनेक वर्षापासून प्रशासनाकडूनही न सुटू शकलेले हे प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष पुढाकार घेत सर्व प्रशासकीय अडथळ्यांचा अभ्यास करून सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. या कार्यामध्ये अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख यांचीही मौलिक भूमिका आहे.
वारसांना नियुक्तीचे कार्ड प्रदान
नागपूर महापालिकेमध्ये काम करताना मृत पावलेले व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या तीन वारसांना नियुक्तीचे कार्ड यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये सौम्य कन्हैया बिरहा, मंजू दर्पण खरे व जितेंद्र भीमराव टेंभरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीचे कार्ड देण्यात आले. इतरांना कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.