आबादी जागेवरील भूखंड वाटपात घोळ?
By admin | Published: January 4, 2015 12:54 AM2015-01-04T00:54:44+5:302015-01-04T00:54:44+5:30
नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल
मनसर : नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनीच केला आहे. यासंदर्भात काहींनी पारशिवनीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.
पाली-उमरी पटवारी हलका क्रमांक-४ मधील उमरीतील नवीन आबादी जागेवरील सर्व्हे क्रमांक-३०/१ (आराजी-०.९१ हेक्टर आर.)ची विभागणी करून त्यातील जमिनीचे पट्टे ३० लाभार्थ्यांना वाटप करावयाचे होते. ही वाटप प्रक्रिया १० वर्षांपासून रखडली होती. या जमिनीवर ३० बाय ५०, ३० बाय ३० याप्रमाणे एकूण ३० भूखंड तयार करण्यात आले आणि ते ३० लाभार्थ्यांना वाटायचे होते. यातील नऊ भूखंडाची मागणी नागरिकांनी केली नाही. त्यामुळे सदर नऊ भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. उर्वरित २१ भूखंड नायब तहसीलदार पी. आर. आडे यांच्या आदेशान्वये २०१३-१४ मध्ये वाटण्यात आले.
सदर भूखंडाचे वाटप ईश्वर चिठ्ठीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, ते भूखंड रहिवासी प्रयोजनासाठी देण्यात आले होते.
या आबादी जमीन भोगाधिकार मूल्य ३० बाय ५० फूट शासकीय कर आकारणी अथवा खंड ३,७८० रुपये चालान क्रमांक-५१ आणि भूखंड क्रमांक-३१, ८३, ६१ चौरस मीटर जमिनीवरील ८३.६१ चौरस मीटर, ९०० चौरस फूट जमिनीवरील कर आकारणी २६ हजार २६८ रुपये चालान क्रमांक-३२ अन्वये एकूण २१ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
ही रक्कम दुप्पट असल्याचेही काहींनी सांगितले. सदर रक्कम तत्कालीन तलाठी ढोरे यांच्या तोंडी आदेशान्वये तत्कालीन सरपंच ईश्वर खंगार यांनी वसूल केल्याचा आरोप तहसीलदार तेढे यांना दिलेल्या तक्रारीत लाभार्थ्यांनी केला आहे.
शासकीय आबादी जागेवर पाडण्यात आलेल्या भूखंड वाटपात घोळ झाल्याचा आरोपही करण्यात आला. उपासराव केवट, दामोदर खडसे, इंदिरा ठाकरे, प्रल्हाद उकुंडे, राजू शेंडे सर्व रा. उमरी या लाभार्थ्यांना मूळ कर भरणा आकारणीनुुसार ३,७८० रुपये आणि २,२६८ रुपयांच्या ताबा पावती देण्यात आल्या. प्रत्यक्षात या लाभार्थ्यांकडून दुप्पट रक्कम घेण्यात आली, असेही या लाभार्थ्यांनी सांगितले.
यासंदर्भात लाभार्थ्यांनी पारशिवनीचे तहसीलदार तेढे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मसराम यांच्याकडे तक्रारी केल्या असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)