सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण २२ ला
By admin | Published: March 19, 2016 02:29 AM2016-03-19T02:29:49+5:302016-03-19T02:29:49+5:30
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती
नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार यंदा २२ मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये सायंकाळी ६ वाजता होईल.
हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. यांच्या गीतांची रंगत या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल.
याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार रुपकुमार राठोड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक के. के. आणि त्यांचा समूह गीतसंगीताची जादू दाखवणार आहेत. त्यामुळे रसिकांसाठी त्यांचे सादरीकरण अविस्मरणीय ठरणार आहे.
श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे लोकमत सखी मंचची स्थापना करून सखी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली.
आकर्षक सन्मानचिन्हाने होणार गौरव
सूर ज्योत्स्ना पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेले सन्मानचिन्ह खास आकर्षक असणार आहे. यात शंख आणि ग्रामोफोनची आकृती असेल. भारतीय संस्कृतीत शंखनादाला विशेष आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. शंखात समुद्राचे भावविभोर करणारे संगीत सामावले आहे तर ग्रामोफोन संगीतातील आधुनिक बदल प्रतीत करणारा आहे. प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या संमिश्रतेतून संगीताचे महत्त्व प्रदर्शित करण्याचा उद्देश यात आहे. हे सन्मानचिन्ह बडोद्याचे प्रसिद्ध शिल्प कलावंत संदीप पिसाळकर यांनी तयार केले आहे.