महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:38+5:302021-05-28T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या शाळांमध्ये दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयातील डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या शाळांमध्ये दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना टॅब्लेट वाटप करण्यात आले.
महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे संपूर्ण शिक्षण पद्धती ऑनलाईन झाली. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण बेताचेच होते. किमान दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.
उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई, शिक्षण समितीच्या उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्य संगीता गिऱ्हे, परिणिता फुके, मो. इब्राहिम टेलर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकातून दिलीप दिवे यांनी विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यामागील भूमिका विशद केली. पहिल्या वर्षी सायकल, दुसऱ्या वर्षी स्वेटर, बूट, मोजे आणि या वर्षी टॅब्लेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या शाळांच्या निकालात कमालीची सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष उपासे यांनी संचालन, तर प्रीती मिश्रीकोटकर यांनी आभार मानले.