जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणुकीस बंदी
By admin | Published: August 13, 2015 03:29 AM2015-08-13T03:29:48+5:302015-08-13T03:29:48+5:30
केंद्र, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारात नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे.
केंद्र, राज्य व नाबार्डचा सामंजस्य करार : बँका आॅक्टोबरमध्ये सुरू होणार
नागपूर : केंद्र, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारात नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी गेल्या दहा वर्षांत जिल्हा बँकांवर संचालक पदावर राहिलेल्या संचालकांसाठी लागू राहील.
जिल्हा बँका सुरू झाल्यानंतर पुढे केव्हातरी होणाऱ्या निवडणुकीत संचालकांना निवडणुकीत उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यात झालेल्या करारात ही अट टाकण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (सहकार) शैलेशकुमार शर्मा यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नाबार्डचे सरव्यवस्थापक यू.एस. साहा, महाराष्ट्र राज्य को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक योगिता खोब्रागडे, मैथली कोहळे उपस्थित होते.