नागपुरात जिल्हा बँकेचे कर्मचारी बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:27 PM2019-03-05T23:27:21+5:302019-03-05T23:27:57+5:30
वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्त्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी देवेंद्र वानखेडे वगळता ७२ शाखा आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी मंगळवार, ५ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर प्राधिकृत मंडळाच्या धोरणाविरोधात नारे-निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्त्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी देवेंद्र वानखेडे वगळता ७२ शाखा आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी मंगळवार, ५ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर प्राधिकृत मंडळाच्या धोरणाविरोधात नारे-निदर्शने केली. मागण्यांवर चर्चा न झाल्यामुळे संप बुधवारीही सुरू राहील.
संपामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे ग्राहक बँकिंग सेवेपासून वंचित राहिले. बँकेचे चार लाखांपेक्षा जास्त ग्राहक असून, त्यात ५० ते ६० हजार शेतकरी ग्राहक आहेत. संप पुढे काही दिवस सुरू राहिल्यास बँक पूर्णत: अडचणीत येणार आहे. मार्च महिना असल्याने बँकेच्या ठेवी आणि शेतकर्ज वसुलीवर मोठा परिणाम होणार आहे. विभागीय सहकारी संस्थेचे सहनिबंधक व बँकेच्या प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वानखेडे, सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक व मंडळाचे सदस्य अजय कडू, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ अनिल पाटील आणि बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजल कोरडे यांनी कर्मचाऱ्यांसोबत मागण्यांवर कुठलीही चर्चा न केल्यामुळे, संप आणखी तीव्र होणार आहे.
बँकेच्या ७२ शाखांचे व्यवस्थापक आणि रोखपाल यांनी शनिवारी शाखा आणि तिजोरीच्या चाव्या प्रशासकीय अधिकारी देवेंद्र वानखेडे यांच्याकडे सोपविल्या आहेत. शहाणे म्हणाले, कर्मचाऱ्यांची एप्रिल २०१४ पासून नियमित सुरू असलेली वार्षिक पगारवाढ आणि मे २०१५ पासून महागाई भत्ता रोखण्यात आला आहे. प्राधिकृत मंडळाच्या अध्यक्षपदी सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा रखडला आहे. तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांनीही कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता रोखता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. वरिष्ठांच्या निर्देशानंतर आणि बँक नफ्यात असतानाही व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
संपादरम्यान युनियनचे सचिव चंद्रकांत रोठे, कोषाध्यक्ष अनुपकुमार पाटील, मिलिंद घोरमाडे, किशोर आसटकर, जयंत आदमने, राजेंद्र वानखेडे आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.