मनोरुग्णालयाच्या जागेवर जिल्हा रुग्णालय

By admin | Published: December 18, 2014 02:57 AM2014-12-18T02:57:14+5:302014-12-18T02:57:14+5:30

नागपुरातील शासकीय मनोरुग्णालयाच्या ११ एकर जागेवर जिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव विभागाला प्राप्त झाला असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, ...

District Hospital at the site of the psychiatric hospital | मनोरुग्णालयाच्या जागेवर जिल्हा रुग्णालय

मनोरुग्णालयाच्या जागेवर जिल्हा रुग्णालय

Next

नागपूर : नागपुरातील शासकीय मनोरुग्णालयाच्या ११ एकर जागेवर जिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव विभागाला प्राप्त झाला असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली. नागपुरातील डागा रुग्णालयात बेडची संख्या वाढवून १०० करणे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपचे आ. सुधाकर देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडत नागपुरातील मनोरुग्णालयाच्या ११ एकर जागेवर जिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे का, यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे का, अशी विचारणा केली. यावर डॉ. सावंत यांनी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आवश्यक तरतूद केली जाईल, असे सांगितले. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, समीर मेघे, विजय वडेट्टीवार आदींनी या लक्षवेधीद्वारे नागपूर ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले.
विकास कुंभारे यांनी मेयो व डागा इस्पितळात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी करीत मेयोमध्ये एमआरआय मशीन कधी देणार, अशी विचारणा केली. विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान एक एमबीबीएस डॉक्टर देण्याची मागणी केली. सत्यजित पाटील यांनी डॉक्टरांचे पे स्केल कमी असल्यामुळे ते रुजू होत नसल्याकडे लक्ष वेधले. यावर आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी मुलाखतींद्वारे डॉक्टरांची भरती प्रक्रिया आता दरमहा घेतली जाईल, असे आश्वासन दिले. नागपूर मंडळातील सहा जिल्ह्यांतर्गत ( गट अ ६६००) संवर्गातील ८८ पदे भरली असून १६० पदे रिक्त असल्याचे व आरोग्य सेवा (गट अ ५४००) संवर्गातील ८३३ पदे भरली असून १७५ पदे रिक्त आहेत. ही पदे एमपीएससी व पदोन्नतीच्या माध्यमातून भरली जात असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: District Hospital at the site of the psychiatric hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.