तीन इस्पितळांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
By Admin | Published: March 18, 2017 02:52 AM2017-03-18T02:52:38+5:302017-03-18T02:52:38+5:30
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना : लाभार्थ्यांकडून घेतले अतिरिक्त शुल्क
नागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी धंतोली येथील ‘क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल’, मेडिट्रीना हॉस्पिटल व ‘शतायु हॉस्पिटलवर कारवाई केली, तर रुग्णांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन केशव हॉस्पिटलची मान्यता काढून घेतली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या जिल्हा नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत योजनेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या आॅनलाईन तक्रारीची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले, अमरावती येथील अब्दुल रहीम रहेमान यांच्यावर धंतोली येथील ‘क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल’मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधून हृदयशस्त्रक्रिया झाली. संबंधित हॉस्पिटलने पॅकेज व्यतिरिक्त ५९ हजार ५०० रुपये अतिरिक्त शुल्क घेतल्याची तक्रार त्यांनी केली. या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयाला अतिरिक्त घेतलेले शुल्क परत देण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच धंतोली येथील शतायु हॉस्पिटलमध्ये तुषार सरोदे यांचेकडून ‘किडनी स्टोन’च्या शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या पॅकेज व्यतिरिक्त ४० हजार रुपये घेतले. या संदर्भात त्यांनी आॅनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अतिरिक्त शुल्क परत करण्यात आले आहे. या योजनेसंदर्भात नऊ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी तीन तक्रारींचे निवारण करुन संबंधितांना दिलासा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के राव, जिल्हा शल्यचिकित्सक यु.बी. नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, वार्डेकर, राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटीचे विभागीय सदस्य फनेंद्र चंदा, डॉ. लोहित लांजेवार, डॉ. पुरुषोत्तम चौधरी, नीलेश बागडे, डॉ. स्वप्नील दडमल आदी उपस्थित होते.