नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:22 PM2018-12-29T22:22:16+5:302018-12-29T22:25:28+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मौदा शहरातील जिराफे ले आऊट भागात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. त्यात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (मौदा) : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मौदा शहरातील जिराफे ले आऊट भागात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. त्यात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
राजू कोमलचंद जैन (४५, रा. इतवारी, नागपूर), मनोज चंदूभाई गडिया (४३, रा. लकडगंज, नागपूर), हरिओम रमेश जुनेजा (३५, रा. हिवरीनगर, नागपूर) व अमोल गोविंद इलमकर (२८, रा. यशोधरानगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मौदा शहरातील जिराफे ले आऊट येथील संजय जागोजी मदनकर यांच्या घरी क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री बनावट ग्राहकाला पाठवून खात्री पटवून घेतली. तिथे भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने लगेच धाड टाकली.
त्यात चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. शिवाय, त्यांच्याकडून एमएच-४९/एई-२६०० क्रमांकाची कार, सेट टॉप बॉक्स, ३९ मोबाईल हॅण्डसेट, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, लाईन मशीन असा एकूण १६ लाख ९१ हजार रुपये किमतीचे साहित्य आणि १५ हजार ४०० रुपये रोख असा एकूण १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, चंद्रशेखर घडेकर, अविनाश राऊत, दुर्गाप्रसाद पारडे, प्रणयसिंग बनाफर, अश्विनी मोहोड, साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली.