नागपूर जिल्ह्यात रेती-गिट्टी व्यावसायिकांत संघर्ष पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:39 PM2018-10-13T23:39:26+5:302018-10-13T23:41:52+5:30
रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा युक्तिवाद करीत रेती वाहतूकदारांनी गिट्टीचे ओव्हरलोड ट्रक अडविले आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. एवढेच नव्हे तर या वाहतूकदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
अरुण महाजन। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा) : रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा युक्तिवाद करीत रेती वाहतूकदारांनी गिट्टीचे ओव्हरलोड ट्रक अडविले आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. एवढेच नव्हे तर या वाहतूकदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
योगेश डोंगरे हे रेती वाहतूकदार असून, त्यांच्या नेतृत्वातील काही रेती वाहतूकदारांनी गुरुवारी रात्री खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्यासमोर गिट्टीचे दोन ट्रक अडविले. शिवाय, पोलिसांना बोलावून ती गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक असल्याचे निदर्शनास आणून दिले. रेती व गिट्टी गौण खनिज असताना रात्रीच्या वेळी रेती वाहतुकीवर बंदी का घालण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत गिट्टीची रात्री होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी पोलीस अधिकाºयांकडे करण्यात आली.
ही बाब नियमात बसत नसल्याचे पोलीस अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र, रेती वाहतूकदार काहीही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे रेती वाहतूकदार योगेश गोखे यांनी सावनेरच्या उपविभागीय अधिकारी (महसूल) वर्षाराणी भोसले यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. भोसले यांनी लगेच महसूल निरीक्षक (आरआय) राठोड यांना कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पाचारण केले. मात्र, रात्रीच्या वेळी गिट्टीच्या वाहतुकीवर बंदी नसल्याचे सांगून त्यांनी कारवाई करण्यास नकार दिला. शिवाय, त्यांनी गिट्टीच्या ट्रकची क्षमताही न तपासल्याने रेती वाहतूकदारांनी पोलीस ठाण्यासमोर धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
दरम्यान, सावनेर, खापा, कळमेश्वर, खापरखेडा, पाटणसावंगी, दहेगाव (रंगारी), कोराडी येथील रेती वाहतूकदारांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामोर निदर्शने केली; शिवाय जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना निवेदन दिले.
रेतीच्या उपशावरही बंदी
रात्रीच्यावेळी रेतीच्या वाहतुकीसोबतच उपशावरही बंदी घालण्यात आली आहे. रेतीचा उपसा आणि वाहतूक ही सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्याची नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात मध्य प्रदेश तसेच भंडारा जिल्ह्यातून रात्रभर रेतीची अवैध वाहतूक खुलेआम केली जात आहे. रेती वाहतूकदार एकाच रॉयल्टीचा उपयोग वारंवार करीत असून, क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जाते. या बाबी कंत्राटात नमूद केल्या असतानाही त्यांची पायमल्ली केली जाते.
धाबे दणाणले
महसूल विभाग तसेच सावनेर व खापा पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेतीवाहतुकीचे काही ट्रक पकडले. त्यात अमित राय यांचे तीन तर, स्वप्नील तळेकर, राजेंद्र पौनीकर, गुलाब राय, विक्की लुल्ला, कृष्णा यादव यांच्या प्रत्येकी एका ट्रकचा समावेश आहे. ही कारवाई रात्रीच्यावेळी करण्यात आली असून, रेतीचे ट्रक ओव्हरलोड होते. या कारवाईमुळे रेती वाहतूकदार चिडले आणि त्यांनी त्यांचा रोष गिट्टीचे ट्रक अडवून व्यक्त केला.