पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार; नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:47 PM2019-03-02T14:47:57+5:302019-03-02T14:48:30+5:30
प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. महापालिकेच्या परिवहन विभागाची डिझेलवर धावणारी बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात या बसच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. धानाच्या तणसापासून सीएनजी निर्माण करून यावर वाहने धावतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या १५० बसेस लवकरच सीएनजीवर धावतील. तसेच महापालिकेची १५० वाहने सीएनजीवर करण्यात यावी, यातून महापालिकेची ७० कोटींची बचत होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत केल्यास महामंडळाचा तोटा कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.