कोरोना चाचणीसाठी नागपुरात एम्स व मेयोला वाटून दिले विदर्भातील जिल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 01:04 PM2020-04-08T13:04:31+5:302020-04-08T13:06:00+5:30
एकाच प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार पडू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेयोच्या प्रयोगशाळेकडे विदर्भातील पाच तर ‘एम्स’च्या प्रयोगशाळेकडे सहा जिल्ह्यांचा भार सोपविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) कोरोनाची चाचणी सुरू असताना तीन दिवसांपूर्वी येथील यंत्र बंद पडले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रातोरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) कोरोना तपासणीची मान्यता मिळवून दिली. यामुळे नागपुरात आता दोन प्रयोगशाळा झाल्या आहेत. एकाच प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार पडू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेयोच्या प्रयोगशाळेकडे विदर्भातील पाच तर ‘एम्स’च्या प्रयोगशाळेकडे सहा जिल्ह्यांचा भार सोपविला आहे.
‘कोविड-१९’ आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यामध्ये विविध शासकीय, महानगरपालिका व केंद्र शासनाच्या संस्थांमधील १३ प्रयोगशाळांना ‘आयसीएमआर’ने परवानगी दिली आहे. यात कस्तुरबा रुग्णलय मुंबई, के.ई.एम. रुग्णालय परळ मुंबई, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर.ज. जी. समूह रुग्णालय भायखळा मुंबई, हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था परळ मुंबई, बे.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मीरज जि. सांगली, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, ‘एम्स’ नागपूर व मेयो नागपूरचा समावेश आहे. मेयोकडे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्याची जबाबदारी आहे. तर ‘एम्स’कडे अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी आहे. ५ एप्रिलपासून रुग्णसेवेत सुरू झालेल्या ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत आतापर्यंत १८६ नमुने तपासण्यात आले. यातील दोन नमुने पॉझिटिव्ह तर १७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर मेयोने आतापर्यंत ९६१ नमुने तपासले असून १७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या प्रयोगशाळेत मध्यप्रदेश व छत्तीसगड येथूनही नमुने येतात. शनिवारपासून बंद पडलेले येथील यंत्र सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे या दोन्ही प्रयोगशाळेतून रोज दोनशेवर नमुने तपासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.