मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय प्रभारी मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:53 PM2019-07-29T21:53:16+5:302019-07-29T21:54:19+5:30
राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यात्रेत राहतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यात्रेत राहतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा हा प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा पोहोचल्यानंतर तेथील मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत राहतील. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह पदाधिकारीदेखील उपस्थित राहतील. ४,३८४ किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर या यात्रेचा ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे समारोप होईल.
शहांबाबत ‘सस्पेन्स’ कायम
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या उद्घाटनाला केंद्रीय नेते येण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित राहू शकतात. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता याची अंतिम माहिती प्रदेश पातळीवरून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरात २ ऑगस्ट रोजी यात्रा
नागपूर शहरात २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता महाजनादेश यात्रा पोहोचेल. वर्धा मार्ग ते काटोल मार्ग यादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ असेल. चिंचभुवन, विमानतळ, सोमलवाडा, व्हेरायटी चौक, सदर, मेश्राम चौक, गिट्टीखदान, फेटरी असा हा मार्ग असेल. तर ३ ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानक, मेयो इस्पितळ, गांधी पुतळा, टेलिफोन एक्सचेंज चौक, पारडी चौक या मार्गाने यात्रा मौद्याकडे जाईल. यादरम्यान काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे स्वागतदेखील करण्यात येईल. नागपूर शहरात मुख्यमंत्र्यांची एकही सभा होणार नाही. नागपूर जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी काटोल, सावनेर येथे सभा होईल.
असा राहणार महाजनादेश यात्रेचा मार्ग (प्रभारी मंत्री)
१ ऑगस्ट : गुरुकुंज मोझरी, तळेगाव, आर्वी, पुलगाव, वर्धा (डॉ.अनिल बोंडे)
२ ऑगस्ट : पवनार, सेलू, बुटीबोरी, नागपूर, काटोल, सावनेर (चंद्रशेखर बावनकुळे)
३ ऑगस्ट : नागपूर, मौदा, भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया (डॉ.परिणय फुके)
४ ऑगस्ट : गोंदिया, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, वडसा, ब्रम्हपुरी, आरमोरी, गडचिरोली (डॉ.परिणय फुके, सुधीर मुनगंटीवार)
५ ऑगस्ट : गडचिरोली, मूल, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, माढई, वडकी, राळेगाव, कळंब, यवतमाळ (सुधीर मुनगंटीवार, अशोक उईके)
६ ऑगस्ट : यवतमाळ, दारव्हा, कारंजा, मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला (मदन येरावार, डॉ.रणजित पाटील)
७ऑगस्ट : अकोला, बाळापूर, शेगाव, खामगाव, मलकापूर, जामनेर (डॉ.संजय कुटे)
८ ऑगस्ट : जामनेर, भुसावळ, जळगाव (गिरीश महाजन)
पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवाद
सद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.
आता जिल्ह्यात ‘नो इनकमिंग’
नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते भाजपात येणार का, अशी विचारणा केली असता बावनकुळे यांनी त्यास नकार दिला. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची बी टीम भाजपासमवेतच आहे. काही मोजके नेते सोडले तर कार्यकर्ते कधीच भाजपात आले आहेत. आता ‘कोटा फुल्ल’ झाला आहे. त्यामुळे उरलेल्या नेत्यांनी काँग्रेसमध्येच थांबावे, असा टोला बावनकुळे यांनी मारला.