कोळसा हाताळणी विभागातील कामे विभागून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:08 AM2021-07-26T04:08:03+5:302021-07-26T04:08:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोराडी : येथील ६६० मेगावॅटच्या वीज प्रकल्पात कोळसा हाताळणी विभागात असणारे वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे विविध ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : येथील ६६० मेगावॅटच्या वीज प्रकल्पात कोळसा हाताळणी विभागात असणारे वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे विविध विभागात विभागणी करून द्या, अशी मागणी एमएसईबी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोराडीच्यावतीने मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांनी मुख्य अभियंता राजेंद्र घुगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत आहेत. स्थानिक कंत्राटदारांना काम मिळावे, या दृष्टीने कोळसा हाताळणी विभागात असणारे क्लिनिंग, मेंटेनन्स व इलेक्ट्रिकलची कामे एकाच मोठ्या निविदेमध्ये न काढता विविध लहान-लहान विभागात विभागून याच्या निविदा काढाव्या. स्पर्धा पद्धतीनेच पात्र कंत्राटदाराला त्या निविदेनुसार काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे या विभागात एकाच कंत्राटदाराऐवजी अनेक लहान-लहान कंत्राटदारांना काम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच ओएस विभागांमध्येही संच क्रमांक ८,९ व १० प्रमाणेच मनुष्यबळ पुरवण्याच्या कामाची विभागणी करण्यात यावी, जेणेकरून या ठिकाणीसुद्धा स्थानिक व लहान कंत्राटदारांना कामाची संधी मिळेल.
काही निविदांमध्ये संयुक्त एकत्रित काम टाकल्या गेल्यामुळे मोठे कंत्राटदाराच त्यास पात्र ठरतात. हा लहान कंत्राटदारावर अन्याय आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांनाही काम मिळावे, यासाठी या भागातील विभागणी करणे आवश्यक आहे. तसेच कंत्राटदारांना महानिर्मितीकडून नियमित बिलाची रक्कम वेळेवर अदा केली जात नाही. वास्तविक कंत्राटदाराला त्यांच्या कामगारांचा पीएफ, ईएसआयसी व जीएसटी नियमितपणे व वेळेवर भरावा लागतो. अशास्थितीत महानिर्मितीकडून कंत्राटदारांच्या बिलाला विलंब होत असल्याने कंत्राटदार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे महानिर्मितीच्या वतीने कंत्राटदारांना वेळेवर बिलाची रक्कम अदा करण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे रत्नदीप रंगारी यांनी केली आहे.