विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची बदली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:29+5:302021-06-09T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची शासनाने बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची शासनाने बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर बदली केली आहे. त्यांचा कार्यकाळ अतिशय महत्त्वपूर्ण राहिला आहे. नागपूर विभागातील कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी आखलेले नियोजन यशस्वी ठरले. त्यांच्या नियोजनामुळेच आज नागपूर विभागात कोरोना नियंत्रणात येऊ शकला.
डॉ. संजीव कुमार २१ ऑगस्ट २०१८ रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नागपुरात रुजू झाले. विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच होता. १ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्याकडे पूर्णवेळ विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार आला. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच कोरोना नियंत्रणात येऊ शकला. कोरोनाशिवाय विद्यार्थी हिताच्या शिक्षण विभागातही चांगले काम केले. ‘असर’च्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला. याशिवाय विभागातील रेती घाटाचे लिलाव योग्य पद्धतीने पार पाडून विभागाचा महसूल वाढविण्यावर भर दिला. विशेष म्हणजे त्यांनी नागपुरातील फ्लाईंग क्लबचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले. विभागातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची विशेष मोहीम त्यांनी आखली. याशिवाय डॉ. संजीव कुमार यांनी इतरही विविध विषयांमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये चांगले काम करून छाप सोडली.
सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले. अद्याप त्यांच्या जागेवर कुणाचीही नियुक्ती झालेली नाही.