विभागीय वैद्यकीय मंडळाने तत्काळ पदभरती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:31+5:302021-04-27T04:08:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. प्रभावी उपचारासाठी उपलब्ध मनुष्यबळासोबतच वैद्यकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. प्रभावी उपचारासाठी उपलब्ध मनुष्यबळासोबतच वैद्यकीय तज्ज्ञांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. ही बाब लक्षात घेता विभागीय वैद्यकीय मंडळाने तत्काळ सर्व रिक्त पदांवर भरती करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. सोमवारी त्यांनी मेयो, मेडिकलसह एकूण वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
आढावा बैठकीला आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर, नर्सेस यासह अन्य कर्मचारीवर्गाच्या भरतीसाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना पदभरतीचे निर्देश दिले आहेत. रुग्णसंख्या अधिक असल्याने मेडिकलच्या प्रतीक्षा कक्षात अनेक रुग्ण वाट पाहत थांबतात. त्यांची दखल घेऊन त्यांना जलद उपचार मिळावेत. यासाठी त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुदानातून मेयो येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले.
डॉक्टरांसाठी विशेष व्यवस्था
कोविड वॉर्डमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांची विशेष व्यवस्था करण्याची मागणी मार्डने केली होती. या डॉक्टरांची हॉटेल, होस्टेलमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येईल.
हाफकिनच्या लसनिर्मितीला वेळ लागेल
हाफकिन संस्थेतील लसनिर्मितीला केंद्राने मान्यता दिली आहे. मात्र लसनिर्मितीचे मानक व निकषानुसार या प्रक्रियेला वेळ लागेल, असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. यापुढे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. गरजेप्रमाणे रेमडेसिविर औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनीही ठराविक औषधाचा आग्रह करू नये, असेदेखील त्यांनी सांगितले.
मेयोतील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९० टक्के
मेयो-मेडिकलमध्ये कोरोना रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात येत असल्याने कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. मेयोतील कोरोना संसर्गातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास ९० टक्के आहे. मेयोमध्ये सध्या १०० रुग्णांसाठी डोझी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. आणखी १०० डोझी यंत्र येथे लवकरच बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.